नॉटिंघम - इंग्लंडविरोधात आजपासून सुरु होणाऱ्या वन-डे मालिकेमध्ये विराट कोहलीसमोर अंतिम 11 जणांची निवड करताना डोकेदुखी होणार आहे. पुढील विश्वकप स्पर्धा ब्रिटनमध्ये २०१९ मध्ये होणार आहे. त्यामुळे ही मालिका ‘विराट अॅन्ड कंपनी’साठी येथील परिस्थितीसोबत जुळवून घेण्याची चांगली संधी आहे. पुढील वर्षी याच कालावधीत येथे विश्वकप स्पर्धा होणार आहे. भारतीय संघव्यवस्थापनाला विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर विविध पर्याय तपासण्याची संधी मिळाली आहे. के.एल. राहुल चांगल्या फॉर्मात असल्यामुळे कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरू शकतो.
टी-20 मालिकेत कोहली स्वत: चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी आला होता आणि तिसऱ्या क्रमांकावर केएल राहुलला संधी दिली होती. गेल्या दोन वर्षापासून भारतीय फलंदाजी संघ चौथ्या स्थानावर कोलमडताना दिसत होती. पण टी-20 मालिकेत राहुलने तिसऱ्या स्थानावर आपली योग्यता दाखवल्यामुळे या मालिकेत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. सध्या क्रिडाविश्वात तिसऱ्या स्थानावरील सर्वोत्तम फलंदाज म्हणून कोहलीकडे पाहिले जाते. पण संघासाठी आणि केएल राहुलसाठी विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. विराट कोहली चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी आल्यास संघाची फलंदाजी आणखी घातक आणि खोलवर झालेली दिसून येईल.
टी-२० मालिका जिंकल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आजपासून इंग्लंडविरुद्ध सुरु होत असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत लय कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ही मालिका म्हणजे पुढील वर्षी होणाऱ्या विश्वकप स्पर्धेची रंगीत तालिम असल्याचे मानल्या जात आहे. रोहित-धवन ही जोडी सलामीची जबाबदारी पार पाडतील. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर राहुल पुन्हा एकदा आपला जलवा दाखवण्यास सज्ज असणार आहे. चौथ्या स्थानावर कर्णधार विराट कोहली. त्यानंतर मधल्या फळीत पांड्या, रैना/कार्तिक/पांडे, धोनी आणि हार्दिक पांड्या आपली चुनूक दाखवतील. गोलंदाजीत कुलदीप यादवने टी-२० मध्ये छाप पाडली आहे. अतिरिक्त वेगवान गोलंदाज म्हणून सिद्धार्थ कौल किंवा शार्दूल ठाकूर यांना संधी मिळू शकते. भुवनेश्वर कुमार दुखापतीतून सावरला असेल तर तो उमेश यादवसह नव्या चेंडूची जबाबदारी सांभाळेल.
एकदिवसीय मालिकेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या इंग्लंड संघाने यापूर्वीच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 6-0 ने धुव्वा उडवला होता. त्यामुळे इंग्लंड संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. इंग्लंडची गेल्या काही महिन्यांमधील एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. जोस बटलर, जॅसन रॉय, अॅलेक्स हेल्स, जॉनी बेयरस्टो आणि इयान मॉर्गन फॉर्मात असून बेन स्टोक्सच्या उपस्थितीत संघ मजबूत भासत आहे.