India vs England, T20 World Cup 2021 Warm-up Match Live: मोहम्मद शमीनं (Mohammed Shami) सराव सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली. सुपर १२ मधील अव्वल आठ संघांना मुख्य स्पर्धेला सुरूवात होण्याआधी प्रत्येकी दोन सराव सामने खेळायचे आहेत आणि टीम इंडियानं आज इंग्लंडचा सामना केला. इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, परंतु मोहम्मद शमीनं त्यांना बॅकफूटवर फेकले. जॉनी बेअरस्टोनं ( Jonny Bairstow) खिंड लढवताना टीम इंडियासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी करण्यात यश मिळवले. हार्दिक पांड्यानं ( Hardik Pandya) आज एकही चेंडू न फेकल्यानं पुन्हा एकदा त्याच्या समावेशाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
विराट कोहलीनं ( Virat Kohli) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माला ( Rohit Sharma) आजच्या सामन्यात विश्रांती दिल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यात विराटनं T20 World Cup स्पर्धेत रोहित व लोकेश राहुल ही जोडी सलामीला उतरणार असल्याचे जाहीर करताना स्वतः तिसऱ्या क्रमांकावर खेळणार असल्याचे स्पष्ट केले. जेसन रॉय व कर्णधार जोस बटलर ( इयॉन मॉर्गनला विश्रांती) यांनी पहिल्या विकेटसाठी ३६ धावा जोडल्या. शमीनं चौथ्या षटकात बटलरचा ( १८) त्रिफळा उडवला. पुढच्याच षटकात जेसन रॉय ( १७) याचीही विकेट शमीनं काढली. आयसीसी क्रमवारीत अव्वल फलंदाज डेव्हिड मलान ( १८) याला राहुल चहरनं माघारी पाठवलं.
त्यांतर जॉनी बेअरस्टो व लाएम लिव्हिंगस्टोन यांनी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाच्या अडचणी वाढवल्या. पुन्हा एका शमीच धावून आला आणि त्यानं लिव्हिंगस्टोनचा ( ३०) अडथळा दूर केला. पण, शमीच्या अखेरच्या षटकात मोईन अलीनं खोऱ्यानं धावा काढल्या. शमीनं ४ षटकांत ४० धावांत ३ विकेट्स घेतल्या. चेन्नई सुपर किंग्सचा स्टार मोईन अली आज भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना दिसला. १९व्या षटकात जसप्रीत बुमराहनं अप्रतिम यॉर्कर टाकून ४९ धावा करणाऱ्या बेअरस्टोचा त्रिफळा उडवला. बुमराहनं ४ षटकांत २६ धावांत १ विकेट घेतली. मोईन अलीनं २० चेंडूंत नाबाद ४३ धावा कुटल्या. भुवनेश्वर कुमारनं टाकलेल्या २० व्या षटकात इंग्लंडनं २१ धावा जोडून ५ बाद १८८ धावांचा डोंगर उभा केला.
Web Title: India vs England, T20 World Cup 2021 Warm-up Match Live: England to post 188 for 5 from 20 overs, Mohammed Shami takes 3 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.