India vs England, T20 World Cup 2021 Warm-up Match Live: भारतीय फलंदाजांनी आज त्यांचा दम दाखवून दिला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सलामीवीर म्हणून आलेल्या लोकेश राहुल व इशान किशन या जोडीनंच इंग्लंडचा पराभव निश्चित केला. दोघांच्या अर्धशतकी खेळीत ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्व नजाकतभऱ्या फटक्यांची मेजवानी होती. लोकेशनं टोलावलेले उत्तुंग षटकार अन् इशानची बेधडक फलंदाजी भारतीय चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. लोकेश २३ चेंडूंत अर्धशतक झळकावून माघारी परतला, परंतु इशाननं सुसाट फटकेबाजी करून टीम इंडियाचा विजय पक्का केला. रिषभ पंतनं विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
जेसन रॉय व कर्णधार जोस बटलर ( इयॉन मॉर्गनला विश्रांती) यांनी पहिल्या विकेटसाठी ३६ धावा जोडल्या. शमीनं चौथ्या षटकात बटलरचा ( १८) त्रिफळा उडवला. पुढच्याच षटकात जेसन रॉय ( १७) याचीही विकेट शमीनं काढली. आयसीसी क्रमवारीत अव्वल फलंदाज डेव्हिड मलान ( १८) याला राहुल चहरनं माघारी पाठवलं. त्यांतर जॉनी बेअरस्टो व लाएम लिव्हिंगस्टोन यांनी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाच्या अडचणी वाढवल्या. पुन्हा एका शमीच धावून आला आणि त्यानं लिव्हिंगस्टोनचा ( ३०) अडथळा दूर केला.
पण, शमीच्या अखेरच्या षटकात मोईन अलीनं खोऱ्यानं धावा काढल्या. शमीनं ४० धावांत ३ विकेट्स घेतल्या. चेन्नई सुपर किंग्सचा स्टार मोईन अली आज भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना दिसला. १९व्या षटकात जसप्रीत बुमराहनं अप्रतिम यॉर्कर टाकून ४९ धावा करणाऱ्या बेअरस्टोचा त्रिफळा उडवला. बुमराहनं २६ धावांत १ विकेट घेतली. मोईन अलीनं २० चेंडूंत नाबाद ४३ धावा कुटल्या. भुवनेश्वर कुमारनं टाकलेल्या २० व्या षटकात इंग्लंडनं २१ धावा जोडून ५ बाद १८८ धावांचा डोंगर उभा केला. भुवनेश्वर कुमारनं ४ षटकांत ५४ धावा दिल्या. त्यात आर अश्विनचा फॉर्म व हार्दिक पांड्याची तंदुरुस्ती हे चिंतेचे विषय टीम इंडियासमोर आहेतच.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत
इशान किशन व
लोकेश राहुल ही जोडी सलामीला आली अन् इंग्लंडला वादळी तडाखा देऊन गेली. लोकेश व इशान यांनी मैदानाच्या सर्व कोपऱ्यांवर फटकेबाजी केली. लोकेशनं दोन चेंडू थेट स्टेडियमबाहेर भिरकावले. लोकेशनं २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना ६ चौकार व ३ खणखणीत षटकार खेचले. मार्क वूडनं ९व्या षटकात लोकेशला माघारी पाठवून इशानसोबतची ८२ धावांची भागीदारी संपुष्टात आली. या दोघांनी १०च्या सरासरीनं धावा कुटल्या होत्या. आदील राशिदला जबरदस्त षटकार खेचून इशाननं ( ३६ चेंडू) अर्धशतक पूर्ण केलं. भारतानं १२व्या षटकातच शतकी वेस ओलांडली.
लोकेश, इशान यांच्यानंतर विराट कोहलीच्या फटकेबाजीची सर्व प्रतीक्षा करत होते, परंतु लाएम लिव्हिंगस्टोननं टीम इंडियाच्या कर्णधाराला ११ धावांवर माघारी पाठवले. भारताला ४२ चेंडूंत ६२ धावा करायच्या होत्या. इशानच्या जोडीला रिषभ पंत आला अन् मोइन अलीला सलग दोन षटकार खेचून इरादा स्पष्ट केला. ६७ व ६९ धावांवर इशानला जीवदान मिळाले. पण, तो ४६ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७० धावांवर स्वतः रिटायर हर्ट होऊन माघारी परतला.( Ishan Kishan has left the middle for giving opportunity to Suryakumar Yadav ). सूर्यकुमार यादवला फलंदाजीची संधी मिळावी म्हणून इशाननं हा निर्णय घेतला. भारताला अखेरच्या तीन षटकांत २६ धावाच करायच्या होत्या.
१८व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार खेचल्यानंतर पुढील षटकार सूर्यकुमारनं ( ८) डेव्हिड विलीला विकेट दिली. रवींद्र जडेजा पॅड बांधून बसलेला असताना हार्दिक पांड्या फलंदाजीला आला. विलीनं त्या षटकात ६ धावा देत १ विकेट घेतली. भारताला १२ चेंडूंत २० धावा हव्या होत्या. १९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पांड्यानं सुरेख कव्हर ड्राईव्ह मारत चौकार मिळवला. त्यानंतरची दोन चेंडू निर्धाव गेली. ख्रिस जॉर्डननं चौथा चेंडू बाऊन्सर फेकला अन् त्यावर भारताला ४+१ अशा पाच धावा मिळाल्या. त्यात फ्री हिटवर हार्दिकनं चौकार खेचला. आता भारताला ८ चेंडूंत ७ धावाच करायच्या होत्या. सहावा चेंडूवर पुन्हा नो बॉल अन् फ्री हिट. यावेळी स्ट्राईकवर असलेल्या रिषभनं स्क्वेअर लेगला षटकार खेचून टीम इंडियाचा विजय पक्का केला. भारतानं ६ चेंडू व ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला.
Web Title: India vs England, T20 World Cup 2021 Warm-up Match Live: India beat England by 7 wickets in the Warm-up match, chase down 189 runs in the 19th over
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.