India vs England, T20 : भारतीय संघानं इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ विकेट्सनं विजय प्राप्त करत दमदार पुनरागमन केलं. इशान किशननं पदार्पणातच खणखणीत अर्धशतक ठोकलं तर कोहलीनं कर्णधारी खेळी साकारून भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. संपूर्ण सामन्यात भारतीय संघाचं वर्चस्व पाहायला मिळालं. पण सामन्यादरम्यानची एक चूक भारतीय संघाला महागात पडली आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघानं 'स्लो ओव्हर रेट'नं गोलंदाजी केल्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) शिक्षा सुनावली आहे. आयसीसीनं भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या सामन्याच्या मानधनातून २० टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्याचे आदेश दिले आहेत. (Team India Fined 20 Percent Match Fees For Slow Over Rate)
इंग्लंडनं दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघासमोर ६ विकेट्सच्या मोबदल्यात १६४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघानं केवळ तीन विकेट्स गमावून १७.५ षटकांमध्ये लक्ष्य पूर्ण केलं. भारतीय संघासाठी इशान किशन यांनं ३२ चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५६ धावांची खेळी साकारली. इशान किशनसोबत कर्णधार विराट कोहलीनंही ४९ चेंडूत खणखणीत नाबाद ७३ धावांची खेळी साकारली. कर्णधार कोहलीनं पाच चौकार आणि तीन षटकार ठोकले होते.