बर्मिंगहम - चार वर्षांपूर्वी इंग्लंड मालिकेत विराट कोहलीला आलेले अपयश हा भूतकाळ झाला आहे. या चार वर्षांत विराटच्या खेळाचा दर्जा प्रचंड उंचावला आहे आणि बुधवारपासून सुरू होणा-या कसोटी मालिकेत त्याला रोखणे अवघड आहे, असा विश्वास भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे. 2014च्या इंग्लंड दौ-यात विराटला 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 13.50च्या सरासरीने अनुक्रमे 1, 8, 25, 0, 39, 28, 0, 7, 6 आणि 20 धावा केल्या होत्या.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 1 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या मालिकेत विराटच्या खेळीवरच सर्वांच्या नजरा खिळलेल्या असणार आहेत. गेल्या चार वर्षांत विराटने जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये स्थान पटकावले आहे. 'विराटचे विक्रम पाहा. त्यावरूनच गेल्या चार वर्षांत विराटची कामगिरी किती जबरदस्त झाली आहे, याचा अंदाज येतो. जेव्हा तुमच्याकडून अशा पद्धतीचा खेळ होतो, त्यावेळी तुमची मानसिकताही कणखर बनते. त्यामुळे कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तुम्ही सज्ज असता,' असे मत शास्त्रींनी व्यक्त केले.
याआधीच्या मालिकेत इंग्लंडने 2011 मध्ये 4-0 आणि 2014 मध्ये 3-1 असा विजय मिळवला आहे. त्यांनी पुढे सांगितले की,'चार वर्षांपूर्वी विराटला इंग्लंडमध्ये अपयश आले होते, परंतु या चार वर्षांत तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये विराजमान झाला आहे. त्याला जगातील सर्वोत्तम फलंदाज का म्हणतात, हे त्याला इंग्लंडच्या क्रीडा प्रेमींना दाखवायचे आहे. आम्ही येथे सामना अनिर्णीत राखण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी आलो आहोत.'