लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या सामन्यात संघात कोणते खेळाडू असावेत, याबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही यामध्ये उडी घेतली आहे. पहिला कसोटी सामना जर भारताला जिंकायचा असेल तर त्यांनी सलामीवीर शिखर धवनला संघाबाहेर ठेवायला हवे, असे मत गांगुलीने व्यक्त केले आहे.
पहिल्या कसोटीच्या संघनिवडीबाबत गांगुली म्हणाला की, " धवनला हा एकदिवसीय क्रिकेटसाठी चांगला सलामीवीर आहे. आतापर्यंत धवनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण परदेशातील दौऱ्यांमध्ये जेव्हा आपण कसोटी क्रिकेटचा विचार करतो तेव्हा त्यामध्ये धवन आतापर्यंत यशस्वी झालेला दिसत नाही. "
धवनने इंग्लंडविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली. पण त्यानंतर खेळवण्यात आलेल्या इसेक्सविरुद्धच्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावांत धवनला भोपळा फोडता आला नव्हता. पण या सामन्यात मुरली विजयने चांगली कामिगरी केली होती.
गांगुली पुढे म्हणाला की, " धवनला कसोटी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या सामन्यात धवनला वगळून त्याच्या जागी लोकेश राहुलला संघात स्थान द्यायला हवे. मुरली विजय आणि लोकेश राहुल ही जोडी भारताचा चांगली सुरुवात करून देऊ शकेल."