ओव्हल, भारत वि. इंग्लंडः पाचव्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी भारताचा सलामीवर लोकेश राहुल आणि यष्टिरक्षक रिषभ पंत यांनी सहाव्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी केली. त्यामुळे इंग्लंडविरुद्धचा हा सामना भारतीय संघ अनिर्णीत राखतील असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, फिरकी गोलंदाज आदिल रशिदच्या एका चेंडूने सामन्याचे पालटले. रशिदच्या एका अप्रतिम चेंडूने राहुलचा त्रिफळा उडवला. त्याच्या या चेंडूने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याच्या 'जादुई फिरकी'ची आठवण करून दिली.
( ICC Test rankings: मालिका पराभवाचा भारताला धक्का; इंग्लंडला बढती)
राहुल बाद झाल्यानंतर भारताचा डाव गडगडला आणि इंग्लंडने 118 धावांनी सामना जिंकून मालिका 4-1 अशी खिशात घातली. राहुलने 224 चेंडूंचा सामना करताना 149 धावा केल्या. त्यात त्याने 20 चौकार व 1 षटकार लगावला. पंतने 146 चेंडूंत 114 धावा केल्या. चहापानानंतर राहुल आणि पंत यांना माघारी फिरावे लागले आणि भारताचा संपूर्ण संघ 345 धावांवर तंबूर परतला. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने 80 षटकानंतर चेंडू न बदलण्याचा निर्णय घेत फिरकीपटू रशिदवर विश्वास दाखवला. त्याने लेग स्टम्पच्या बाहेर टाकलेल्या चेंडूने अप्रतिम वळण घेत राहुलच्या उजव्या यष्टीचा वेध घेतला. त्याच्या या चेंडूचा 'बॉल ऑफ द सेंच्युरी' म्हणून गौरव केला जात आहे. शेन वॉर्नने 1993साली अॅशेस मालिकेत ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत इंग्लंडच्या माईक गेटिंगला अशाच चेंडूवर बाद केले होते.