लंडन - अॅलेस्टर कुक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या नावावर 156 कसोटीत 12145 धावा आहेत आणि त्यात 32 शतकं आणि 56 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याला बाद करणे हे एखाद्या गोलंदाजासाठी मोठे आव्हानच... पण, भारताच्या मोहम्मद सिराजने एक अप्रतिम चेंडूवर कुकचा त्रिफळा उडवला.
जगातील सातत्यपूर्ण फलंदाजांमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार आघाडीवर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रमही त्याच्या नावावर आहे आणि भारताविरूद्धच्या मालिकेत तो इंग्लंडचा हुकमी एक्का असल्याचे समजले जाते. भारत अ आणि इंग्लंड अ या अनधिकृत कसोटीत त्याने तसे संकेत दिले आहेत. त्याने या सामन्यात 180 धावांची खेळी केली. पहिल्या डावात अनिकेत रजपूतने त्याला बाद केले.
इंग्लंड अ संघाने हा सामना 253 धावांनी जिंकला, परंतु भारताच्या मोहम्मद सिराज भाव खाऊन गेला. त्याने कुकला एका अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत केले. त्यामुळे पहिल्या डावात धावांचा डोंगर उभा करणा-या कुकला दुस-या डावात अवघ्या 5 धावा करता आल्या.