बर्मिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात किती गोलंदाजांनिशी खेळायचे, यावर जोरदार चर्चा सुरु होती. यावेळी फिरकीपटू आर. अश्विनला संधी मिळणार की नाही, याबद्दलही संदिग्धता होता. पण सामन्याच्या पहिल्या सत्रात जिथे वेगवान गोलंदाजांना इंग्लंडला धक्का देता आला नाही तिथे अश्विननेच भारताला दिलासा देण्याचे काम केले आहे. इंग्लंडने उपहारापर्यंत 28 षटकांत १ बाद ८३ अशी मजल मारली होती.
पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी भेदक मारा केला. पण काही वेळा दिशाहीन मारा केल्यामुळे त्यांना भारताला पहिले यश मिळवून देता आले नाही. पण अश्विनने आपल्या दुसऱ्याच षटकात संघाला पहिले यश मिळवून दिले.
अश्विनने आपल्या दुसऱ्या षटकात इंग्लंडचा सलामीवीर अॅलिस्टर कुकला (१३) बाद केले. अश्विनने या षटकात कुकला चांगलेच खेळवले. चेंडूचे टप्पे बदलत त्याने कुकला पेचात पाडले. अश्विनचा चेंडू किती वळणार, हे कुकला समजले नाही आणि त्याचा एक चेंडू कुकला चकवून थेट यष्ट्यांना जाऊन आदळला.
कुक बाद झाल्यावर किअॅटन जेनिंग्स (नाबाद ३८) आणि जो रूट (नाबाद ३१) यांनी दमदार फलंदाजी केली. या दोघांनी सफाईदार फलंदाजी करत भारताच्या गोलंदाजांना यश मिळवू दिले नाही. जेनिंग्सला यावेळी ९ धावांवर असताना जीवदान मिळाले. अजिंक्य रहाणेने जेनिंग्सचा झेल सोडला. पण या जीवदानानंतर जेनिंग्सने दमदार फलंदाजी केली.