Join us  

IND vs ENG: 'टीम इंडिया'मध्येही बंडखोरी? पुजारा, पंत, बुमराह भारतीय संघाविरूद्ध खेळणार!

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर १ कसोटी, ३ वन डे आणि ३ टी-२० सामने खेळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 11:44 AM

Open in App

India vs England Test: भारतीय क्रिकेट (Team India) संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी२० सामने खेळायचे आहेत. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना १ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला एक सराव सामनाही खेळायचा आहे. गुरुवारपासून (२३-२६ जून) इंग्लिश क्लब लीसेस्टरशायर विरुद्ध हा सामना खेळवला जाणार आहे. या सराव सामन्यात चार भारतीय खेळाडू आपल्याच संघाविरुद्ध सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.

नक्की काय आहे प्रकरण?

महाराष्ट्रात सध्या शिवसेना विरूद्ध एकनाथ शिंदे या बंडाची तुफान चर्चा रंगली आहे. मात्र भारतीय संघात बंडखोरी झालेली नाही. चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा हे खेळाडू भारतीय संघाविरूद्ध मैदानात उतरणार आहेत. त्याच कारण वेगळंच आहे. वास्तविक हे चार खेळाडू लीसेस्टरशायर क्लबकडून खेळताना दिसणार आहेत. या क्लबचे कर्णधारपद सॅम इव्हान्सकडे आहे. तर रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार असेल. या ४ दिवसीय सराव सामन्यात दोन्ही संघांकडून १३-१३ खेळाडू खेळतील, जेणेकरून गोलंदाजांवर जास्त ताण पडणार नाही. पण सराव सामना एकच असल्याने भारताच्या चमूतील सर्व खेळाडूंना खेळता यावे यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे.

लीसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबने (एलसीसीसी) आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'आम्ही सराव सामन्यासाठी भारतीय संघाचे स्वागत करतो. टीम इंडियाचा स्टार खेळाडू चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा आमच्या क्लबकडून खेळतील. ज्याचे नेतृत्व सलामीवीर सॅम इव्हान्स करतील. या चार खेळाडूंना या क्लबकडून खेळण्यासाठी क्लब, भारतीय बोर्ड आणि इंग्लिश बोर्ड (बीसीसीआय आणि ईसीबी) यांची संमती मिळाली आहे. त्यामुळे पाहुण्या भारतीय संघातील सर्व खेळाडूंना सराव सामने खेळण्याची संधी मिळणार आहे, असा या मागचा हेतू आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजसप्रित बुमराहचेतेश्वर पुजारारिषभ पंत
Open in App