लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : कारकिर्दीतील पहिल्या आणि अखेरच्या सामन्यात शतक झळकावत इंग्लंडचा सलामीवीर अॅलिस्टर कुकने शतकाला गवसणी घातली आहे. हा विक्रम रचणारा तो पाचवा खेळाडू ठरला आहे. अशी चमकदार कामगिरी करणारा कुक हा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. पहिल्या आणि अखेरच्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये एक भारतीय खेळाडूही आहे, हे तुम्हाला माहिती नसेल.
ऑस्ट्रेलियाच्या रेगी डफ यांची 1902-05 अशी तीन वर्ष कारकिर्द होती. पण डफ यांनी आपल्या पहिल्या आणि अखेरच्या सामन्यात शतक झळकावले होते. सर डॉन ब्रॅडमन यांच्या काळातील बिल पोन्सफोर्ड या ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंनीही असाच विक्रम केला होता.
या विक्रमाच्या यादीत तिसरा क्रमांक लागतो तो ऑस्ट्रेलियाच्याच माजी फलंदाजांचा. ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज ग्रेग चॅपेल यांनीही अशीच चमकदार कामगिरी केली होती. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिननेही आपल्या पहिल्या आणि अखेरच्या सामन्यात शतक झळकावले होते. पण त्यानंतर 18 वर्षांमध्ये हा विक्रम कुणालाही करता आला नव्हता. आता कुकने हा मैलाचा दगड गाठला आहे.