लंडन : इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या सामन्यात भारताच्या डावाची सुरुवात कोण करणार, यावर चर्चा सुरु आहे. शिखर धवनला विदेशातील कसोटी सामन्यांमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी धवनऐवजी सलामीली लोकेश राहुलला संधी द्यावी, असे सल्ले काही माजी क्रिकेटपटूंनी भारतीय संघ व्यवस्थापनाला दिले आहे. पण संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री मात्र धवनच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत.
धवनने इंग्लंडविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. पण इसेक्सविरुद्धच्या सराव सामन्यातील दोन्ही डावांत धवनला भोपळाही फोडता आला नव्हता. त्यानंतर धवन सोशल मीडियावर चांगला ट्रोलही झाला. त्यानंतर धवनला पहिल्या कसोटीसाठी संघात स्थान मिळणार नाही, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण शास्त्री यांनी मात्र धवन याचीच बाजू लावून धरली आहे.
धवनबाबत शास्त्री म्हणाले की, " धवन आणि मुरली विजय ही एक चांगली सलामीची जोडी आहे. आतापर्यंत त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. धवनला सराव सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. पण आतापर्यंत एक सलामीवीर म्हणून त्याने संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. राहुल हा सलामीसाठीचा तिसरा पर्याय आहे. सध्याच्या घडीला धवन आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर जास्त दडपण असेल."