लंडन : इंग्लंडविरुद्धचे दोन्ही सामने भारताने गमावले आहेत. त्यामुळे आता तिसरा कसोटी सामना भारताने गमावला तर त्यांना मालिका गमवावी लागणार आहे. त्यामुळे या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करताना ' या ' खेळाडूला डच्चू द्या, अशी सूचना भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केली आहे.
पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडला चांगली झुंज दिली. पण दुसऱ्या सामन्यात मात्र त्यांना डावाने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी भारतीय संघाची खिल्ली उडवली आहे. त्याचबरोबर भारतीय संघासाठी तिसरा सामना सोपा नसेल, अशी भविष्यवाणीही केली आहे.
भारताचे मुरली विजय, लोकेश राहुल आणि शिखर धवन हे तिन्ही सलामीवीर अपयशी ठरले आहेत. त्याचबरोबर मधल्या फळीतील अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांनाही लौकिकाला साजेशी करता आलेली नाही. त्याचबरोबर यष्टीरक्षक दिनेश कार्तिकलाही आपली छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी नेमक्या कोणत्या खेळाडूला संघाबाहेर काढायचे, हा प्रश्न भारतीय संघ व्यवस्थापनापुढे असेल.
याबाबत गावस्कर म्हणाले की, " तिसरा कसोटी सामना हा भारतासाठी फार महत्त्वाचा असेल. त्यामुळे या सामन्यासाठी संघात काही बदल करायला हवेत असे मला वाटते. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघातून यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला डच्चू देण्यात यावा आणि त्याच्या जागी रिषभ पंतला संघात स्थान देण्यात यावे. कार्तिक दोन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे."