लंडन : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना 18 ऑगस्टपासून नॉटींगहॅम येथे होणार आहे. आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता तिसरा सामना जर त्यांनी गमावला तरी त्यांच्यावर मालिका गमावण्याची वेळ येऊ शकते. पण या तिसऱ्या सामन्यासाठी भारताचे पानीपत ' ही ' जोडी करू शकते, असे म्हटले जात आहे.
पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडला चांगली झुंज दिली. पण दुसऱ्या सामन्यात मात्र त्यांना डावाने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी भारतीय संघाची खिल्ली उडवली आहे. त्याचबरोबर भारतीय संघासाठी तिसरा सामना सोपा नसेल, अशी भविष्यवाणीही केली आहे.
नॉटिंगहॅमच्या मैदानात इंग्लंडच्या जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांची कामगिरी दमदार राहिली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात अँडरसन आणि ब्रॉड यांची जोडी भारताचे पानीपत करू शकते, असे म्हटले जात आहे. कारण या मैदानात या दोघांनी प्रतिस्पर्ध्यांना पळता भूई थोडी करून सोडली आहे.
अँडरसनने या मैदानात आतापर्यंत 9 सामन्यांमध्ये 18.95च्या सरासरीने 60 बळी मिळवले आहेत. नॉटिंगहॅम हे ब्रॉडचे घरचे मैदान आहे. या मैदानात ब्रॉडने 8 कसोटी सामन्यांमध्ये 37 बळी पटकावले आहेत. ब्रॉड हा या मैदानातील तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. ब्रॉडने भारताविरुद्ध या मैदानात दोन कसोटी सामने खेळले आहेत. या दोन सामन्यांमध्ये ब्रॉडने 12 बळी मिळवले आहेत.