लंडन : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पराभवाचे पाढे वाचत आहे. पण तरीदेखील भारतीय संघासाठी एक खूशखबर आहे. भारतीय संघ सध्याच्या घडीला ज्या गोष्टीची वाट ती आता होणार आहे. भारताचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आता फिट झाला असून तो तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारताच्या संघातील मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांच्याकडून चांगला मारा होत आहे. पण उमेश यादवला मात्र अजूनही लय सापडलेली दिसत नाही. त्यामुळे तिसरा वेगवान गोलंदाज संघात असावा, अशी संघ व्सवस्थापनाची इच्छा होती. पण बुमरा फिट नसल्याने त्याला दुसऱ्या सामन्यात संघात स्थान देण्यात आले नव्हते.
आयर्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 सामन्यात बुमराच्या हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर बुमराला एकही सामना खेळता आला नव्हता. बुमरा जायबंदी असला तरी त्याला भारताच्या संभाव्य संघात स्थान देण्यात आले होते. त्यावेळी बऱ्याच जणांनी भुवया उंचावल्या असल्या तरी आता फिट झाल्यामुळे तिसरा सामना खेळू शकतो.