ओव्हल, भारत वि. इंग्लंड कसोटी : इंग्लंडविरुद्धच्या ट्रेंट ब्रिज कसोटीतील विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास दुपटीने वाढला होता. म्हणून त्यांनी खेळाडूंची कामगिरी समाधानकारक झालेली नसतानाही चौथ्या कसोटीत तोच संघ कायम ठेवला. कर्णधार विराट कोहलीने ३८ कसोटींत कधीच एक संघ कायम ठेवला नाही आणि ३९व्या सामन्यात त्याने हे धाडस दाखवले. मात्र, साऊदम्टन कसोटीत भारतीय संघाचे पानिपत झाले आणि भारताला मालिकाही गमवावी लागली.
पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत राहिलेली इभ्रत वाचवण्याचा संघाचा प्रयत्न असेल आणि त्यासाठी अपयशी शिलेदारांना बसवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे ओव्हल कसोटील संघात बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यात अष्टपैलू म्हणून अपयशी ठरलेल्या हार्दिक पांड्याला डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या जागी संघात हनुमा विहारी स्थान मिळवून कसोटी पदार्पण करू शकतो. विहारीने बुधवारी संघासोबत कसून सराव केला.
पाचव्या कसोटीसाठी त्याच्या नावाचा विचार झाल्यास तो पांड्याच्या जागी येऊ शकतो. सलामीवीरांचे अपयश भरून काढण्यासाठी पृथ्वी शॉला संधी मिळू शकते. अशात शिखर धवन किंवा लोकेश राहुल यांच्यापैकी एक बासावर बसवला जाईल. आर अश्विनही पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने रवींद्र जडेजला संधी मिळू शकते.