India vs England, 4th Test, Ahmedabad: भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या अहमदाबाद कसोटीचा आजचा दिवस रोमांचक ठरला. इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांत संपुष्टात आला. पुन्हा एकदा इंग्लंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजीसमोर सपशेल नांगी टाकताना दिसले. प्रत्युत्तरात भारतानं शुबमन गिलला स्वस्तात गमावलं. पण चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा यांनी मैदानात टिच्चून फलंदाजी केली.
अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजीसाठी योग्य नसल्याचा वाद सुरू असतानाच सुनील गावस्कर (sunil gavaskar) यांनी एक महत्वाचं विधान केलं. कसोटी क्रिकेटमध्ये दर्जेदार फलंदाज कसा ओळखावा? याचं गणित त्यांनी मांडलं.
फिरकीला पोषक खेळपट्टीवर फलंदाजाची क्षमता कळते अहमदाबादच्या मागच्या कसोटीत इंग्लंडच्या पराभवाला इंग्लंडच्या फलंदाजांच्या फूटवर्कला सुनील गावस्कर यांनी दोषी ठरवलं. "वेगवान खेळपट्टीवर धावा करणं हिंमतीचं काम आहे. पण फिरकीला पोषक खेळपट्टीवर धावा करण्यातून तुमची क्षमता सिद्ध होते", असं गावस्कर म्हणाले.
"वेगवान खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजाच्या विरोधात खेळताना फलंदाजासमोर दोन पर्याय असतात. एकतर फलंदाज बॅकफूटवर जाऊन खेळू शकतो किंवा क्रिसच्या पुढं उभ राहून सामना करू शकतो. पण फिरकीला पोषक खेळपट्टीवर या दोन पर्यायांसोबतच तुम्हाला 'डाउन द ट्रॅक' येऊनही खेळता यायला हवं. त्यात उत्तम बचावही तुम्हाला करता यायला हवा. यातूनच फलंदाज किती दर्जेदार आहे याची कल्पना येते. त्यामुळे एखादा फलंदाज ऑस्ट्रेलिया किंवा आफ्रिकेसारख्या वेगवान खेळपट्ट्यांवर धावा करतो तेव्हा तो हिंमतवान खेळाडू म्हणून ओळखला जाऊ शकतो. पण त्याच फलंदाजानं जर भारतासारख्या फिरकी पोषक खेळपट्ट्यांवर धावा वसुल केल्या तर तो गुणवान खेळाडू ठरतो", असं सुनील गावस्कर यांनी सविस्तरपणे समालोचन करताना सांगितलं. फिरकीला पोषक खेळपट्ट्यांवर उत्तम फलंदाजी करणाऱ्या फलंदाजालाच मी मोठा खेळाडू समजतो, असंही गावस्कर यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, याआधीचा कसोटीचा सामना दोनच दिवसांत संपुष्टात आल्यानं सुरू झालेल्या वादानंतरच फिरकीला पोषक खेळपट्ट्यांचा विषय चर्चेत आला होता. या सामन्याआधीच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेतही भारताचा कर्णधार विराट कोहलीला विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये ४० टक्के प्रश्न हे खेळपट्टीबाबतच होते. त्यावर कोहलीनंही जशासतसं प्रत्युत्तर देत जेव्हा वेगवान खेळपट्ट्यांवर सामना दोन दिवसांत संपतो तेव्हा कुणीच प्रश्न उपस्थित करत नाही. पण फिरकीला पोषक खेळपट्टीवर सामना लवकर संपला की गाजावाजा केला जातो, असं कोहली म्हणाला होता.