मुंबई : इंग्लंडमधील कसोटी मालिकेत भारताला सलामीची समस्या भेडसावत आहे. कारण शिखर धवन, मुरली विजय आणि लोकेश राहुल हे तिन्ही सलामीवीर अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे भारतीय संघ चांगल्या सलामीवीराच्या शोधात आहे. त्याचवेळी भारताचा क्रिकेटपटूरोहित शर्माने मी भारतासाठी कसोटीमध्ये सलामी करण्यातासाठी तयार आहे, असे म्हटले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये रोहितने चांगली कामगिरी केली होती. पण कसोटी संघात मात्र त्याला स्थान मिळवता आले नव्हते. त्यामुळे कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच तो मायदेशी परतला आहे. रोहितला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात स्थान देण्यात आले होते, पण त्यावेळी तो अपयशी ठरला होता.
सलामी करण्याबाबत रोहित म्हणाला की, " मलाही कसोटी क्रिकेट खेळायला आवडले असते, पण ते माझ्या हातामध्ये नाही. पण जर संघ व्यवस्थापनाने मला सलामी करण्याची संधी दिली तर त्यासाठी मी सज्ज आहे. संघ व्यवस्थापन जी माझ्यावर जबाबदारी सोपवू इच्छिते त्यासाठी मी तयार आहे. जर मला संधी दिली तर मी सलामीही करू शकतो. "