बर्मिंगहम - भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी अवघ्या काही तासांत सुरू होणार आहे. भारतीय संघाच्या कामगिरीप्रमाणे कर्णधार विराट कोहलीच्या खेळीवरही सा-यांच्या नजरा खिळल्या आहेत. पहिल्या कसोटीत मुरली विजय, लोकेश राहुल आणि शिखर धवन यांच्यापैकी कोणाला संधी मिळेल हे नाणेफेकीच्या वेळीच स्पष्ट होइल. पण, पहिल्या कसोटीत विराटसेनेचे 'हे' पाच शिलेदार संघात असतील, तर एक वेगळाच इतिहास रचला जाणार आहे.
इंग्लंडच्या भूमीत भारताला 2007 नंतर कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे विराटसेना 11 वर्षांनंतर हा पराक्रम करण्यासाठी उत्सुक आहे. 1932 मध्ये भारताने इंग्लंडमध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. मात्र, 1971 मध्ये भारताने परदेशात पहिली कसोटी लढत आणि मालिका जिंकण्याचा विक्रम केला आणि तोही इंग्लंडविरूद्ध. पण, इंग्लंडमधील भारतीयांची कामगिरी हवी तशी समाधानकारक झालेली नाही.
इंग्लंडमध्ये 1932 ते 2017 या कालावधीत इंग्लंडविरूद्ध खेळलेल्या 17 कसोटी मालिकांपैकी केवळ 3 जिंकता आल्या आहेत. यावेळी भारतीय संघ आणखी एक मालिका विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहे आणि त्यासाठी विराट सर्वोत्तम संघ मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे.
सलामीचा प्रश्न त्याला भेडसावत असला तरी पहिल्या सामन्यात मुरली विजय आणि शिखर धवन या अनुभवी जोडीला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यापाठोपाठ मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा, विराट आणि अजिंक्य रहाणे यांचे स्थान पक्के समजले जात आहे. पहिल्या कसोटीत हे अव्वल पाच फलंदाज दिसल्यास एक वेगळा विक्रम नोंदवला जाईल. 2014च्या इंग्लंड दौ-यात भारतीय संघ याच प्रमुख पाच फलंदाजांसह खेळले होते. त्यामुळे भारताच्या क्रिकेट इतिहासात प्रथमच भारतीय संघ सलग दोन इंग्लंड दौ-यात त्याच पाच फलंदाजांसह खेळण्याचा विक्रम करेल.