- स्वदेश घाणेकर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा भ्रमाचा भोपळा इंग्लंडमध्ये फुटला. पाच सामन्यांची कसोटी मालिका भारताने चौथ्या सामन्यातच यजमानांना भेट दिली. या मालिकेतील भारतीय संघाचे अपयश लपण्यासारखे नाहीच आहे. पण ते अपयश दाखवताना गोलंदाजांची भरीव कामगिरी झाकोळली जात आहे, याची कुणाला जाणीवच राहिलेली नाही.
इंग्लंडमध्ये भारतीय संघाला ६१ कसोटी सामन्यांपैकी केवळ ७ सामने जिंकता आलेले आहेत. उसळत्या व वेगाने दिशा बदलणाऱ्या चेंडूवर भारतीय फलंदाज ( काही अपवाद वगळता) यशस्वी झालेच नाही. त्यामुळे भारताने येथे मालिका गमावली यात नवं ते काय? फलंदाजाचे अपयश हे इंग्लंड खेळपट्टीवरील नेहमीचेच रडगाणे झालेले आहे. हा पण भारतीय खेळपट्टीवर मर्दुमकी गाजवणारे हे फलंदाज ज्या पध्दतीने या मालिकेत खेळले ते निंदनीयच आहे.
गोलंदाज इशांत शर्मा, मोहम्मद शमी, आर अश्विन, जस्प्रीत बुमरा, उमेश यादव, हार्दिक पांड्या यांनी आपले कौशल्य पणाला लावून भारताच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. शर्माने अनेक विक्रमही मोडले. विक्रमांच्या बाबतीत बुमरा व पांड्याही मागे नाहीत. पण फलंदाजांच्या अपयशामुळे संघ हरला आणि गोलंदाजांची कामगिरी झाकोळली. मालिकेतील चार सामने झाले आहेत आणि त्यात सहावेळा भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा संपूर्ण संघ माघारी धाडला. १९८६ नंतर भारतीय गोलंदाजांना प्रथमच अशी कामगिरी करता आली आहे. त्यात आपला हुकुमी एक्का भुवनेश्वर कुमार संघात नसताना भारतीय गोलंदाजांकडून अशी कामगिरी होणे म्हणजे उल्लेखनीयच, म्हणावी लागेल.