नवी दिल्ली : जर खेळाडूंनी आपल्या शरीराची काळजी घेतली नाही, तर त्यांना दुखापत होऊ शकते. या गोष्टीचे सर्वात मोठे उदाहरण ठरत आहे भारतीय क्रिकेट संघ. कारण आयपीएलमध्ये कसलीही पर्वा न करता भारतीय खेळाडू खेळत राहीले आणि त्यामुळेच इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना त्यांना दुखापतींनी ग्रासले.
आयपीएलमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नाकाला दुखापत झाली होती, तरीदेखील तो खेळत राहीला होता. त्याने त्यावेळी विश्रांती घेतली नाही. त्याच्या या अति कामाचा परिणाम त्याच्या शरीरावर होताना दिसत आहे. सध्याच्या घडीला कोहली हा पाठदुखीने त्रस्त आहे. पाठिच्या दुखण्यामुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी क्षेत्ररक्षणाला येऊ शकलेला नाही. त्याचबरोबर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी तो पाचव्या क्रमांकावर उतरला होता.
आयपीएलमध्ये जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमार हे भारताचे दोन्ही गोलंदाज कायम खेळत राहिले. त्यामुळे अति खेळल्यामुळे त्यांना दुखापती झाल्या आहेत आणि ज्यावेळी भारताला त्यांची गरज आहे तेव्हा ते खेळू शकत नाहीत. आतापर्यंत पहिल्या दोन्ही सामन्यांना त्यांना मुकावे लागले आहे. भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा हादेखील आयपीएलमध्येच जायबंदी झाला होता. आता तर त्याला या वर्षभरात क्रिकेट खेळता येणार नाही. आयपीएलचे जसे फायदे आहेत, तसे त्याचे तोटे आता सर्वांना दिसत आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये कितीवेळ खेळायचे, हे प्रत्येक खेळाडूने ठरवायला हवे.