आपल्याकडे जगातील सर्वोत्तम फलंदाज, इंग्लंडच्या खेळपट्टीवर उत्तम चेंडू टाकणारे गोलंदाज, एखादा सामना जिंकण्यासाठी लागणारी कौशल्यपूर्ण फौज असूनही भारतीय संघ हरला. कारण परदेशात कसोटी मालिका जिंकण्याचा विश्वास कमावण्याचा प्रयत्नच आपण कधी केला नाही. सर्वोत्तम खेळाडूंची फळी घेऊन मैदानात उतरलो की विजय सहज मिठी मारेल, हा फाजील आत्मविश्वास घेऊन विराट कोहली आणि कंपनी इंग्लंडमध्ये दाखल झाले. तो भ्रमाचा भोपळा लॉर्ड्स कसोटीतच फुटला. पण तो मान्य करण्यासाठी पाचव्या कसोटीच्या निकालाची प्रतीक्षा पाहावी लागली.
भारतीय संघाला इंग्लंडला त्यांच्याच मायभूमीत पराभूत करण्याची ही नामी संधी होती, ती आपण गमावली. फलंदाजांचे अपयश, क्षेत्ररक्षणातील चूका, निर्णय क्षमतेचा अभाव आणि अहंकार यामुळे भारताने पराभव ओढावून घेतला. खर तर या मालिकेचा निकाल हा भारताच्या बाजूने ३-२ असा लागू शकत होता. पण ऐनवेळी भारतीय फलंदाजांनी शस्त्र म्यान केले आणि काय झाले हे आपण सर्वांनी पाहिले. फलंदाजांचे अपयश हे एकमेव कारण पराभवाला पुरेसे आहे असे नाही. फलंदाजांची निराशाजनक कामगिरीवर विराट कोहलीने आपल्या खेळातून पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. पण एकखांबी डोलारा जास्त काळ टिकत नाही त्याला इतरांचाही आधार लागतो, हे विराट आणि शास्त्री गुरुजी ( मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री) विसरले. सलामीवीरांचे अपयश झाकण्यासाठी त्यांनी केलेले सर्व प्रयोग फसले. ते फसण्यासारखेच होते.
मुरली विजय आणि शिखर धवन यांच्याकडे पुरेसा अनुभव असूनही त्यांनी इंग्लंडच्या गोलंदाजासमोर नांगी टाकली. सलामीचा तिसरा पर्याय लोकेश राहुल याच्यावरील 'विराट' प्रेम भारताला महागात पडले. अखेरच्या सामन्यात त्याने दाखवलेल्या क्लासची छोटीशी झलक आधीच्या चार सामन्यात दिसली असती तरी निकाल फिरले असते. पण पाणी नाकातोंडाशी आल्यावर हातपाय मारण्याची आपली वृत्ती, पाचव्या सामन्यात नाही खेळलो तर थेट संघातून बाहेर, या भीतीपोटी तो खेळला. आता काय मालिकेतील त्याच्या मागील सर्व चुका माफ आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड पक्की.
चेतेश्वर पुजाराला सूर गवसला, पण त्याला उशीर झाला. सलामीच्या अपयशामुळे सर्व जबाबदारी ही त्याच्या खांद्यावर होती, परंतु त्याने ती घेतलीच नाही. मुंबईकर अजिंक्य रहाणे हा तंत्रशुद्ध फलंदाज आहे, परंतु तो या मालिकेत संघासोबत आहे की नाही हे कळतच नव्हते. सलामीवीरांइतकाच अजिंक्यही तितकाच दोषी आहे. त्याचे असणे नसल्यातच जमा होते. तो सतत कोणत्यातरी दडपणाखाली असल्याचे जाणवत होते. भारताला अद्यापही सक्षम अष्टपैलू खेळाडू मिळालेला नाही. हार्दिक पांड्याला गरजेपेक्षा अधिक संधी मिळाली. रवींद्र जडेजाला प्रेक्षकाच्या भूमिकेत ठेवले. हनुमा विहारीच्या रुपाने एक पर्याय मिळाला आहे, परंतु त्याला विराट सर किती संधी देतात यावर भवितव्य अवलंबून आहे.
रिषभ पंतचे कौतुक... त्याची कालची खेळी विशेष भाव खाऊन गेली. पण या यशाने हुरळून न जाता सातत्य राखण्याचे आव्हान त्याने पेलले पाहिजे. त्याच्या रुपाने यष्टिरक्षकाचा उत्तम पर्याय आपल्याला मिळाला आहे. आता या कळीला फुलू द्यायचे की कोमेजण्यासाठी सोडून द्यायचे यावर सर्व अवलंबून आहे. वृद्धिमान साहाच्या दुखापतीनंतर कसोटी संघाला मिळालेला हा योग्य पर्याय आहे. करुण नायरला संधी देता आली असती, पण तो विराटच्या फेव्हरेट लिस्ट मध्ये नाही. त्यामुळे कितीही टीका झाली, तरी त्याला सोयीने लांबच ठेवले.
गोलंदाजांनी आपली भूमिका चोख वठवली. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय गोलंदाजांनी केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक झालेच पाहिजे. पण इंग्लंडच्या प्रमुख फलंदाजांना जितक्या झटपट बाद करण्यात ते यशस्वी झाले. ते कौशल्य तळाच्या फलंदाजांसाठी वापरायला ते विसरले. किंबहुना तसे करण्यास त्यांना भाग पाडले? एका इंग्रजी वृत्तपत्राने पाचव्या कसोटीपूर्वी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या तळाच्या खेळाडूंना सौम्य मारा करण्यास सांगितले असल्याचा दावा केला होता. त्यामुळे इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांबद्दलची ही सौम्य भूमिका आपल्याला किती महागात पडली, हे सांगायला नको. इशांत शर्मा, जस्प्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि आर अश्विन यांनी त्यांना दिलेली जबाबदारी पार पाडली. पण, त्यांना अधिक चांगली कामगिरी करता आली असती.
या लाजिरवाण्या पराभवानंतर तरी विराटने संघातील सतत बदल थांबवायला हवेत. त्याचे बदलाचे प्रयोग खेळाडूंचे खच्चीकरण करण्याचे मुख्य कारण आहे. पुढच्या सामन्यात आपले स्थान असेल की नाही या भीतीतच खेळाडू खेळतात. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आणि त्याचा संघाच्या कामगिरीवर होणाऱ्या परिणामाला आपण सामोरे जात आहोत. भारतीय संघातील खेळाडू अगदी टाकाऊ आहेत असे नक्की म्हणायचे नाही. मात्र मायदेशात धावांचा पाऊस पाडून त्यांच्यात निर्माण झालेला अहंकार भारताला परदेशा खेळताना महगात पडत आहे. इंग्लंड दौऱ्यातील कामगिरीनंतर भारतीय संघाला 'बडा घर पोकळ वासा' ही उक्ती अगदी साजेशी आहे.