मुंबई - ट्रेंट ब्रिज कसोटीत विजय मिळवून मालिकेत कमबॅक करणाऱ्या भारतीय संघाला धक्का बसला आहे. इंग्लंडविरूध्दच्या मालिकेत भारतीय संघ १-२ असा पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिकेत बरोबरीसाठी चौथी कसोटी जिंकणे महत्त्वाचे आहे, परंतु भारताला चिंतेत टाकणारे वृत्त समोर आले आहे. भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनला ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सामन्याला मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार अश्विनला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तिसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी त्याला ही दुखापत झाली होती. त्याच्या समावेशाबाबतचा अंतिम निर्णय संघ सरावाला सुरुवात करेल त्यावेळी घेण्यात येणार आहे. तिसऱ्या कसोटीत अश्विन तंदुरुस्तीशे झगडत होता. त्याला या सामन्यात केवळ एकच विकेट घेता आली. त्याने पहिल्या डावात एक, तर दुसऱ्या डावात २२.५ षटके टाकली.
अश्विन फिटनेस टेस्ट मध्ये अपयशी ठरल्यास त्याजागी रविंद्र जडेजाला संधी मिळण्याची शक्यता आहे. जडेजाने ३६ कसोटींत १७१ विकेट घेतल्या आहेत. चौथी कसोटी साउदॅम्प्टन येथे ३० ऑगस्टपासून खेळवण्यात येणार आहे.