लंडन - वन डे मालिकेतील पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाला आणखी एक धक्का पचवावा लागणार आहे. इंग्लंडविरूद्घच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होण्याआधीच भारताची चिंता वाढवणारी बातमी येऊन धडकली आहे. भारताचा प्रमुख गोलंदाज जस्प्रीत बुमरा पहिल्या तीन कसोटी सामन्यांना मुकण्याची शक्यता बळावली आहे. 1 ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. आयर्लंडविरूद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात बुमराच्या अंगठ्याला दुखापत झाली होती आणि ती पूर्णपणे बरी झालेली नाही. कसोटी मालिकेसाठी आज (बुधवारी) भारतीय संघाची घोषणा होणार असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) बुमराचा त्यात समावेश करणार नसल्याची चिन्हे आहेत. टी-20 आणि वन डे मालिकेत प्रभावी कामगिरी करणा-या फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळू शकते. त्याशिवाय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत यालाही कसोटी संघात प्रथमच स्थान मिळण्याची शक्यता आहे. जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाने भारताच्या गोलंदाजीची धार तीव्र होणार आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शमीला दुखापत झाली होती आणि त्यानंतर तो संघाबाहेर आहे. इंग्लंडविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी त्याच्या नावाचा विचार सुरू होता, परंतु तो यो-यो फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला. कसोटी मालिकेत शमीसह जलद मा-याची जबाबदारी भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्या खांद्यावर असेल. त्यांच्या मदतीला अष्टपैलू हार्दिक पांड्याला संघात स्थान मिळू शकते. इंग्लंड दौ-यात मर्यादित षटकांच्या मालिकेत सर्वाधिक विकेट्स पटकावणारा कुलदीप अनुभवी फिरकीपटू आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांच्या उपस्थित संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. मात्र, वृद्धीमान सहाच्या गैरहजेरीत दिनेश कार्तिक हा पहिली चॉइस असू शकतो, परंतु पंतला संधी देऊन निवड समिती अनपेक्षित धक्का देऊ शकतात. पंत सध्या भारत अ संघासोबत इंग्लंड दौ-यावर आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India Vs England Test : कसोटी मालिकेपूर्वी भारताला जबरदस्त धक्का
India Vs England Test : कसोटी मालिकेपूर्वी भारताला जबरदस्त धक्का
वन डे मालिकेतील पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाला आणखी एक धक्का पचवावा लागणार आहे. इंग्लंडविरूद्घच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होण्याआधीच भारताची चिंता वाढवणारी बातमी येऊन धडकली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 9:30 AM