लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना रविवारी संपला. या सामन्यात भारतावर डावाने पराभूत होण्याची नामुष्की ओढवली. इंग्लंडच्या खेळाडूंना या सामन्यात भरीव कामगिरी केली, त्यामुळेच त्यांना हा सामना सहजपणे जिंकता आला. पण या सामन्यात एका खेळाडूने ' ना बॅटींग केली ना बॉलिंग, पण तरीही त्याने 11 लाख रुपयांची कमाई केली आहे.
भारताला दुसऱ्या सामन्यात एक डाव आणि 159 धावांनी मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने हा सामना जिंकत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आंतरराष्ट्रीय 550 कसोटी बळींचा टप्पा गाठला आहे. अँडरसनने पहिल्या डावात पाच, तर दुसऱ्या डावात चार बळी मिळवले. इंग्लंडचा खेळाडू ख्रिस वोक्सने अष्टपैलू कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कारही पटकावला.
दुसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा केला, त्यामुळे 'त्या' खेळाडूला गोलंदाजी करता आली नाही. त्याचबरोबर इंग्लंडने फक्त एकाच डावात फलंदाजी केली. इंग्लंडने पहिला डाव घोषित केला आणि त्याला फलंदाजीला यायला मिळाले नाही. क्षेत्ररक्षणामध्येही त्याने काही खास कामगिरी केली नाही. तरीही त्याने 11 लाख रुपये कमावले, तो खेळाडू ठरला इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशिद. मैदानावर योगदान न देता सामन्याचे मानधन पटकावणारा तो तेरावा खेळाडू ठरला आहे.