बर्मिंगहम : भारताविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने एका नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. पदार्पण केल्यावर कमी दिवसांत कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावा करण्याचा विश्वविक्रम रुटने आपल्या नावावर केला आहे.
रुटने १३ डिसेंबर २०१२ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पण केल्यावर २०५८ दिवसांमध्येच रुटने सहा हजार धावांचा पल्ला गाठला आहे. हा विश्वविक्रम रचताना रुटने अॅलिस्टर कुक (२१६८), केव्हिन पीटरसन (२१९२), डेव्हिड वॉर्नर (२२१६) यांना मागे टाकले आहे. हा विक्रम करणारा रुट हा दुसरा युवा खेळाडू ठरला आहे. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (२६ वर्षे ३१३ दिवस) हा सहा हजार धावांचा पल्ला गाठणारा सर्वात युवा खेळाडू ठरला होता, त्यानंतर रुटचा दुसरा क्रमांक लागतो.
हा सामना सुरु होण्यापूर्वी रुट सहा हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी ४० धावांनी पिछाडीवर होता. या सामन्यात अश्विनला चौकार लगावत रुटने ४३ धावा पूर्ण केल्या आणि सहा हजार धावांचा टप्पा गाठला आहे.