India vs England Test Match: सामना साहेबांच्या हातात; यजमान इंग्लंडचा विजय ११९ धावा दूर

ज्यो रुट आणि जॉनी बेयरस्टो यांनी इंग्लंडला भक्कम स्थितीत आणताना चौथ्या गड्यासाठी नाबाद १५० धावांची भागीदारी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 06:24 AM2022-07-05T06:24:33+5:302022-07-05T06:24:57+5:30

whatsapp join usJoin us
India vs England Test Match: Hosts England will win by 119 runs | India vs England Test Match: सामना साहेबांच्या हातात; यजमान इंग्लंडचा विजय ११९ धावा दूर

India vs England Test Match: सामना साहेबांच्या हातात; यजमान इंग्लंडचा विजय ११९ धावा दूर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बर्मिंगहॅम : यजमान इंग्लंडनेभारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीत आपली स्थिती भक्कम केली आहे. ३७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर ३ बाद २५९ धावांची मजल मारली. इंग्लंडला आता ११९ धावांची गरज असून त्यांचे ७ फलंदाज शिल्लक आहेत.

लक्ष्याचा पाठलाग करताना ॲलेक्स लीस आणि झॅक क्रॉली यांनी १०७ धावांची सलामी दिली. दोघांनी जवळपास ५ हून अधिकच्या धावगतीने फटकेबाजी केली. अखेर २२व्या षटकात कर्णधार जसप्रीत बुमराहने क्रॉलीला त्रिफळाचीत करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. क्रॉलीने ७६ चेंडूंत ७ चौकारांसह ४६ धावा केल्या. यानंतर दोन धावांत आणखी २ बळी गेल्याने इंग्लंडचा डाव बिनबाद १०७ धावांवरुन ३ बाद १०९ धावा असा घसरला. लीसने ६५ चेंडूंत ८ चौकारांसह ५६ धावांची दमदार खेळी केली, तर ओली पोप शून्यावर बाद झाला.

परंतु, ज्यो रुट आणि जॉनी बेयरस्टो यांनी इंग्लंडला भक्कम स्थितीत आणताना चौथ्या गड्यासाठी नाबाद १५० धावांची भागीदारी केली. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रुट ११२ चेंडूंत ९ चौकारांसह नाबाद ७६ धावा, तर बेयरस्टो ८ चौकार व एका षट्काराने ८७ चेंडूंत नाबाद ७२ धावांवर खेळत होता. बुमराहने नियंत्रित मारा करताना २ बळी घेतले. त्याआधी, चेतेश्वर पुजारा व ऋषभ पंतच्या अर्धशतकामुळे भारताने दुसऱ्या डावात समाधानकारक मजल मारली. पुजाराने १६८ चेंडूंत ८ चौकारांसह ६६, तर पंतने ८६ चेंडूंत ८ चौकारांसह ५७ धावा केल्या. 

भारत पहिला डाव : ४१६, दुसरा डाव : २४५, इंग्लंड पहिला डाव : २८४, दुसरा डाव : ॲलेक्स लीस धावबाद ५६, जॅक क्राऊली त्रि. गो. बुमराह ४६, अली पोप झे. पंत गो. बुमराह ०, ज्यो रुट खेळत आहे ७६, जॉनी बेयरस्टो खेळत आहे ७३. अवांतर: ९, एकूण : ५७ षटकात ३ बाद २५९. गोलंदाजी : बुमराह १२-०-५३-२, शमी १२-२-४९-०, जडेजा १५-२-५३-०, सिराज १०-०-६४-०, शार्दुल ७-०-३३-०.

जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या एका कसोटी मालिकेत सर्वाधिक २३ बळी घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. त्याने १९८१-८२ सालचा कपिलदेव यांचा २२ बळींचा विक्रम मोडला. भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत ६०० हून अधिक धावा फटकावणारा ज्यो रुट पाचवा फलंदाज ठरला. बेयरस्टोने सलग पाचव्या कसोटी डावामध्ये ५० हून अधिक धावांची खेळी केली. इंग्लंडमध्ये एकाच कसोटीत दोन्ही डावांमध्ये ५० हून अधिक धावांची खेळी करणारा पंत हा महेंद्रसिंग धोनीनंतरचा केवळ दुसरा भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ठरला.

नशीबवान बेयरस्टो!
३८व्या षटकात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर हनुमा विहारीने स्लीपमध्ये बेयरस्टोचा मौल्यवान झेल सोडला. त्यावेळी बेयरस्टो अवघ्या १४ धावांवर खेळत होता. हा सुटलेला झेल भारताला चांगलाच महागात पडला. ४८व्या षटकात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक ऋषभ पंतला बेयरस्टोचा एक कठीण झेल घेण्यात अपयश आले. यावेळी बेयरस्टो ३९ धावांवर खेळत होता.

Web Title: India vs England Test Match: Hosts England will win by 119 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.