लंडन : बातमीचं शिर्षक वाचून तुम्हाला धक्का बसला असेल. रवी शास्त्री हे भारताचे मुख्य प्रशिक्षक आहे, तर मग ते इंग्लंडच्या संघाला नवा फॉर्म्युला का सांगत आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण त्यांनी हा नवा फॉर्म्युला सांगताना आपला राग व्यक्त केला आहे.
मंगळवारी शास्त्री यांनी इसेक्सच्या मैदानातील खेळपट्टीवर नाराजी दर्शवली होती. खेळपट्टीवरील गवत त्यांनी कापायला सांगितले, असे तेथील मैदानातील कर्मचाऱ्यांनी सांगितले आणि त्यामुळे चार दिवसांचा सामना तीन दिवसांमध्ये आटोपण्याचा निर्णय घेण्यात आला. पण मी खेळपट्टीवरील गवत कापायला सांगितलेच नव्हते, असा खुलासा आता शास्त्री यांनी केला आहे.
शास्त्री याबाबत म्हणाले की, " आम्ही इंग्लंडमध्ये खेळताना कोणतीही सबब देणार नाही. खेळपट्टीवरील गवत कापायला मी सांगितले नव्हते. इंग्लंडमध्ये खेळताना मी कोणतेही प्रश्न विचारणार नाही. " हे सांगितल्यावर शास्त्री यांनी नवा फॉर्म्युला इंग्लंडला सांगितला आहे. ते म्हणाले की, " आम्ही इंग्लंडमध्ये खेळपट्टीवरबद्दल काही बोलणार नाही आणि तुम्हीदेखील भारतात आला की कुठलेही प्रश्न विचारायचे नाही. "