लंडन : भारताला इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही कसोटी मालिकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर भारतीय संघाला दुखापतींनी त्रस्त केलं आहे. आतापर्यंतच्या दोन्ही कसोटी सामन्यांत भारताच्या आर. अश्विनने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आता तो भारताचा कर्णधार होऊ शकतो, या चर्चेला सुरुवात झाली आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनने आपल्या फिरकीच्या जोरावर इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलेच नाचवले होते. दुसऱ्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावांत अश्विनने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे अश्विनकडून चांगली अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळते आहे.
सध्याच्या घडीला जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार आणि वृद्धिमान साहा हे तिघेही जायबंदी आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीची पाठ दुखत होती. या पाठदुखीमुळे तो सामन्याच्या चौथ्या दिवशी क्षेत्ररक्षणाला येऊ शकला नव्हता. त्याचबरोबर फलंदाजीलाही तो पाचव्या क्रमांकावर आला होता. आता तिसरा कसोटी सामना 18 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. तोपर्यंत जर कोहली फिट होऊ शकला नाही तर अश्विनकडे कर्णधारपद देण्यात येऊ शकते. कारण सध्याच्या घडीला अश्विन हा संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे.