लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका गमवावी लागली आहे. भारतीय संघाला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पण तरीही संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा अहंकार मात्र कमी होताना दिसत नाही. हा भारताचा संघच सर्वोत्तम आहे, अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली आहेत.
पराभव झाल्यावर तो स्वीकारायला मोठं मन लागतं, असं म्हणतात. पण शास्त्री पराभव स्वीकारायच्या मनस्थितीती नाहीत. गिरे फिर भी टांग उपर, असंच काहीसं शास्त्री यांचं झालेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शास्त्री यांच्यावर टीका होत आहे.
शास्त्री याबाबत म्हणाले की, " गेल्या 15-20 वर्षांमध्ये आम्ही जी कामगिरी केली आहे ती कोणत्याही भारतीय संघाला करता आलेली नाही. त्यामुळे परदेशात गेल्या 15-20 वर्षांमधला हा सर्वोत्तम संघ आहे. इंग्लंडने ही मालिका जिंकली असली तरी आम्ही त्यांना चांगली लढत दिली. जर चौथा सामना आम्ही जिंकलो असतो तर आम्ही मालिकेत 2-2 अशी बरोबरी करू शकलो असतो. यावरून हा संघच सर्वोत्तम आहे, असे मला वाटते."