चेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहली, कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी महान वेगवान गोलंदाज ग्लेम मॅग्रालाही कोहलीची कामगिरी पाहण्याची उत्सुकता आहे. कारण ही मालिका कोहलीसाठी आव्हानात्मक असेल, असे मॅग्राला वाटते.
याबाबत मॅग्रा म्हणाला की, " इंग्लंडमध्ये चेंडू चांगले स्विंग होतात. एखाद-दुसरी विकेट झटपट पडली आणि विराट फलंदाजीला आला तर त्याला स्विंग गोलंदाजीचा सामना करणे कठिण ठरेल. कोहली हा चांगला फलंदाज आहे. त्याच्याकडे चांगले फटकेही आहेत. पण या कसोटी मालिकेत तो किती धावा करू शकतो, याकडे माझे लक्ष असेल. "
तो पुढे म्हणाला की, " आपण इंग्लंडमध्येही धावा करू शकतो, हे दाखण्याची विराटला आता संधी आहे. कारण यापूर्वी झालेल्या दौऱ्यात विराटला चांगली फलंदाजी करता आली नव्हती. सध्याच्या घडीला विराट चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे तो यावेळी चांगल्या धावा करून स्वत:ला सिद्ध करू शकतो. "