Stuart Broad on Virat Kohli: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला भारताचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहली मुकला. किंग कोहलीने वैयक्तिक कारणास्तव सध्या सुरू असलेल्या मालिकेतून माघार घेतली आहे. खरं तर पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला तेव्हा विराटचा संघात समावेश होता. मात्र, बीसीसीआयने विराटने अचानक वैयक्तिक कारणास्तव आपले नाव मागे घेतल्याचे सांगितले. उर्वरीत तीन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा झाली असून कोहली या सामन्यांमध्येही खेळणार नाही. याबाबत बोलताना इंग्लंडचा माजी खेळाडू स्टुअर्ट ब्रॉडने एक मोठे विधान केले.
आताच्या घडीला पाच सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. तिसरा सामना राजकोट येथे होणार आहे. विराट कोहलीची कमी भारतीय संघाला जाणवत असून त्याच्या अनुपस्थित मालिका होत आहे हे दुर्दैव असल्याचे ब्रॉडने सांगितले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. राजकोटमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हैदराबाद कसोटीत इंग्लिश संघाने भारताचा पराभव केला होता. यानंतर टीम इंडियाने विशाखापट्टणममध्ये मोठा विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली.
विराटची कसोटीत अनुपस्थिती'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रॉडने सांगितले की, विराट कोहली नसताना मालिका खेळवली जात आहे हे दुर्दैव म्हणावे लागेल. पण, भारतीय संघाला शेवटचा कसोटी सामना जिंकण्यात यश आले. कोहली एक अप्रतिम खेळाडू आहे. त्याची मेहनत, जिद्द आणि उत्साह साहजिकच आमचे लक्ष वेधतो. मात्र यामुळे युवा खेळाडूंना देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळते.
तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, लोकेश राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांचे संघात पुनरागमन झाले आहे. परंतु वैद्यकीय संघाकडून फिटनेसबाबत मंजुरीनंतरच त्यांचा संघात सहभाग शक्य होईल. म्हणजेच जडेजा आणि राहुल संघात परतले असले तरी ते खेळतील याबाबत निश्चिती नाही. जडेजा आणि राहुलला दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर राहावे लागले होते.