बर्मिंगहॅम - एसेक्सविरूध्दच्या सराव सामन्यात अपयशी ठरल्यानंतर भारताचा सलामीवीर शिखर धवन टीकेचा धनी ठरला होता. तीन दिवसीय सराव सामन्यात पहिल्या डवात त्याला भोपळा फोडता आला नाही, तर दुसऱ्या डावातही अवघ्या तीन चेंडूंत त्रिफळाचीत होऊन तो माघारी परतला. दोन्ही डावात त्याने मिळून चार चेंडू खेळले. कसोटी मालिकेच्या दृष्टीने ही धवनसाठी चांगली बाब नाही.
सराव सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ झाल्यानंतर धवनने फलंदाजीचा सराव करत असलेला व्हिडिओ ट्विटरवर टाकला होता. त्यावरून नेटिझन्सने त्याची चांगलीच खिल्ली उडवली. रविवारी पुन्हा त्याच्यावर हा प्रसंग ओढावला. त्याने विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा सोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आणि त्याखाली काव्यात्मक ओळ लिहिली. त्यावरून नेटिझन्सनी त्याला पुन्हा ट्रोल केले. आधी नीट फलंदाजी कर, किती दिवस दुसऱ्यांच्या पाठिंब्यावर राहणार आहेस असे खोचक सल्ले व प्रश्न त्याला विचारण्यात आले.
धवनच्या अपयशामुळे मुरली विजयसह सलामीला लोकेश राहुलला संधी मिळू शकते.