मुंबई - इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. 194 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 162 धावांवर माघारी परतला. या लढतीत फलंदाजांचे अपयश हे भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. त्यामुळे लोकेश राहुलला स्थान देण्यासाठी चेतेश्वर पुजाराला वगळण्याच्या कर्णधार विराट कोहलीच्या निर्णयावर टीका होत आहे. भारताचा माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवागने ट्विटकरून कोहली व प्रशिक्षक रवी शास्त्री यांची दांडी उडवली आहे.
कौंटी क्रिकेटमध्ये पुजाराला 12 डावांत 14.33 च्या सरासरीने 172 धावाच करता आल्या आहेत. कदाचित त्यामुळे त्याला पहिल्या कसोटीत खेळवण्यात आले नाही. मात्र, एडबॅस्टन येथील पराभवानंतर त्याला दुस-या सामन्यासाठी संधी मिळण्याची शक्यता आहे. संघात बदल करावा की नाही याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असताना सेहवागने ट्विट करून त्यात भर घातली आहे. पुजाराला दुस-या कसोटीत खेळवावं की नाही, असा प्रश्न सेहवागने चाहत्यांना विचारला आहे.
दरम्यान, इंग्लंडच्या संघातून अष्टपैलू बेन स्टोक्सला वगळण्यात आले आहे, त्याच्या जागी ख्रिस वोक्सला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर डेव्हिड मलानलाही संघातून बाहेरचा रस्ता दाखवला असून त्याच्या जागी ऑली पोप या युवा खेळाडूला संधी दिली आहे.