लॉर्ड्स - आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाला रविवारी लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडकडून मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच डावाने पराभूत झाला. 'आम्ही पराभूतच होणार होतो,'अशी प्रतिक्रिया विराटने दिली.
( India vs England 2nd Test: अँडरसन - ब्रॉडचा भेदक मारा, लॉर्ड्स कसोटीत भारताचा दारुण पराभव)
या पराभवामुळे भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 0-2 असा पिछाडीवर गेला आहे. या सामन्यासाठी अंतिम संघ निडवण्यात चूक झाल्याचा मोठा खुलासा विराटने केला. सामन्यानंतर विराट म्हणाला,'अभिमान वाटावा अशी कामगिरी आमच्याकडून झालेली नाही. मागील पाच कसोटी सामन्यांपैकी प्रथमच आम्हाला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. त्यामुळे या पराभवाला आम्हीच जबाबदार आहोत. केवळ फलंदाजांना दोष देऊन चालणार नाही. अंतिम संघ निवडताना चूक झाली.'
( India vs England 2nd test: सोशल मीडियावर विजयची 'मुरली' वाजवली )
दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी भारताला इंग्लंडविरुद्ध एक डाव आणि १५९ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. पहिल्या डावात २८९ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर भारताची चहापानापर्यंत ६ बाद ६६ धावा अशी केविलवाणी अवस्था झाली होती. येथेच भारताचा पराभव निश्चित झाला होता. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी ४ बळी घेत भारताचे कंबरडे मोडले. या शानदार विजयासह इंग्लंडने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे.