लंडन : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताची कामगिरी कशी होते, यावर साऱ्यांच्या नजरा आहेत. त्याचबरोबर विराट कोहली कशी कामगिरी होते, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. पण भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मात्र भारताला या मालिकेत स्वत:ला सिद्ध करायचे असेल तर हे ' दोन खेळाडू संघात पाहिजेच, असे म्हटले आहे.
गावस्कर यांनी आपल्या स्तंभात म्हटले आहे की, " पहिल्या कसोटी सामन्यात नेमकी संधी कोणाला द्यायची, याचा विचार भारतीय संघ व्यवस्थापनाला करावा लागेल. यापूर्वी भारतीय संघ पाच गोलंदाजांनिशी मैदानात उतरत होता. पण इंग्लंडमध्ये त्यांची रणनीती कायम राहणार का, हे पाहावे लागेल. पण जर पाच गोलंदाज संघात असतील तर त्यामध्ये दोन फिरकी गोलंदाज कोण असतील, हेदेखील ठरवावे लागेल. "
भारतीय कोणते दोन खेळाडू उपयुक्त योगदान देऊ शकतात, याबद्दल सुनील गावस्कर म्हणाले की, " भारतीय संघात कोणतेही समीकरण असले तरी दोन खेळाडू फार उपयुक्त ठरू शकतात. हे दोन खेळाडू म्हणजे आर. अश्विन आणि हार्दिक पंड्या. कारण भारताच्या फलंदाजांना जर चांगली कामगिरी करता आली नाही. तर अश्विन आणि पंड्या हे दोघेही तळाला उपयुक्त फलंदाजी करू शकतात. त्याचबरोबर गोलंदाजीमध्येही त्यांचे योगदान संघाला मिळेल. "