नवी दिल्लीः भारत विरुद्ध इंग्लंड: इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीवर माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवागने टीका केली आहे. माजी सलामीवीर सेहवागने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत परखड मत व्यक्त करताना प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही समाचार घेतला. सेहवाग म्हणाला की,'संपूर्ण मालिकेत भारतीय फलंदाजांचे मनोबल खचलेले पाहायला मिळाले. कसोटीतील अव्वल संघ असूनही कठीण परिस्थितीत संघाला समाधानकारक कामगिरी करण्यात अपयश आले.'
इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी शास्त्री यांनी हा संघ सर्वोत्तम संघ असल्याचा दावा केला होता. शास्त्रींच्या त्या विधानाचा समाचार घेताना सेहवाग म्हणाला,' ड्रेसिंग रूममध्ये बाता मारून संघ बनत नाही. खेळाडूंना मैदानावरील कामगिरीतून ते सिद्ध करून दाखवावं लागत. या मालिकेत फलंदाजांनी नांगी टाकल्या. त्यामुळे शास्त्री यांच्या दाव्याचा काहीच अर्थ राहत नाही. तुम्ही जगाच्या नजरेत स्वतःला सर्वोत्तम संघ म्हणून घेत असाल आणि मैदानावरील तुमची कामगिरी अशी होत असेल, तर तुम्ही मस्करीचा विषय बनता.'
पराभवाचे कारण विचारले असता त्याने सांगितले की,'मोईन अलीच्या गोलंदाजीचा सामना करण्यात भारतीय फलंदाज अपयशी ठरले. 2014च्याही इंग्लंड दौऱ्यात अलीनेच सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या तळाच्या खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले आणि तेच भारताच्या अपयशाचे कारण ठरले. मालिकेत बरोबरी मिळवण्याची भारताकडे चांगली संधी होती.
Web Title: India vs England Test: Teams are made by performances on the ground, Virender Sehwag hits out at Ravi Shastri
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.