लंडन - इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिली कसोटी ही यजमानांसाठी विशेष महत्वाची आहे. क्रिकेटचे जनक असलेल्या इंग्लंडचा हा 1000 वा सामना आहे. कसोटी क्रिकेटमध्ये हे शिखर सर करणारा तो पहिलाच संघ आहे. पण, हा प्रवास इतका सोपा नव्हता. अनेक संघर्ष आणि चढ-उतारांच्या शर्यतीतून इंग्लंडने अविरत वाटचाल सुरू ठेवली आहे. हजाराव्या सामन्याचा अनुभव घेणा-या इंग्लंडच्या वाटचालीतील त्या प्रत्येक पहिल्या टप्प्यावर टाकलेला दृष्टीक्षेप...
पहिली कसोटी - 15 मार्च 1877 इंग्लंडने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिली अधिकृत कसोटी खेळली. चार्ल्स बॅनर्मनच्या 165 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना 45 धावांनी जिंकला.
पहिला कर्णधार - जेम्स लिलीव्हाईट (ज्यु.) हे इंग्लंडच्या ऐतिहासिक कसोटी सामन्याचे पहिले कर्णधार.
पहिला विजय - इंग्लंडला विजयासाठी फार काळ ताटकळत रहावे लागले नाही. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुस-या कसोटी त्यांनी 4 विकेट राखून विजय मिळवला. या थरारक लढतीत दोन्ही संघांकडून अष्टपैलू खेळ झाला. 3 बाद 9 अशा दयनीय अवस्थेतून इंग्लंडने 121 धावांचे लक्ष्य पार केले. जॉर्ज उलयेट यांच्या अर्धशतकी खेळीला याचे श्रेय जाते.
पहिली विकेट - अॅलन हिल यांनी इंग्लंडकडून पहिली विकेट घेण्याचा मान मिळवला. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटीतील पहिल्या सामन्यात त्याने नॅट थॉम्सनचा त्रिफळा उडवला होता. त्या सामन्यात त्यांना एकाच विकेटवर समाधान मानावे लागले. मात्र, दुस-या कसोटीतील पहिल्या डावात त्यांनी 4 विकेट घेतल्या.
पहिले शतक - डब्लू जी ग्रेस... इंग्लंडच्या कसोटी इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिले गेलेले नाव. 6 सप्टेंबर 1880 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चौथ्या कसोटीत ग्रेस यांनी 294 चेंडूंत 152 धावा केल्या. त्यांच्या या फलंदाजीच्या जोरावर यजमानांनी तीन दिवसांत पाच विकेट राखून विजय मिळवला होता. (ग्रेस मध्यभागी)
पहिला मालिका विजय - इंग्लंडने 1880च्या दौ-यात घरच्या प्रेक्षकांसमोर पहिल्या कसोटी मालिका विजयाची चव चाखली होती. त्या मालिकेत इंग्लंडने ग्रेस यांच्या शतकाच्या जोरावर एकमेव विजय मिळवला होता.
पाच विकेट घेणारा पहिला गोलंदाज - अल्फ्रेड शॉ यांनी इंग्लंडच्या पहिल्याच कसोटीत पाच विकेट घेतल्या होत्या आणि तशी कामगिरी करणारे ते पहिले इंग्लिश गोलंदाज ठरले. सामन्याच्या दुस-या डावात त्यांनी 38 धावांत 5 विकेट घेतल्या.
दहा विकेट घेणारा पहिला गोलंदाज - या विक्रमासाठी इंग्लंडला बरीच वर्षे प्रतीक्षा करावी लागली. 1956 मध्ये फिरकीपटू जीम लेकर यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध दहा विकेट घेतल्या हेत्या. ऑफ स्पीनर लेकर यांनी पहिल्या डावात 37 धावांत 9 गडी टीपले, तर दुस-या डावात 53 धावांत ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ माघारी पाठवला होता.
पहिला संघ - हॅरी जप्प, जॉन सेल्बी (यष्टीरक्षक), हॅरी चार्लवूड, जॉर्ज उलयेट, अँड्य्रू ग्रीनवूड, टॉम अॅर्मीटॅज, अल्फ्रेड शॉ, टॉम इम्मेट, अॅलन हिल, जेम्स लिलीव्हाईट ज्यु. (कर्णधार), जेम्स साऊथर्टन.