Join us  

India vs England Test: बरं झालं विराट कोहलीला साक्षात्कार झाला, अन्यथा...

India vs England Test: इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा झालेला पराभव, यात नवीन काहीच नाही. भारताने येथे विजय मिळवला, तर तो ऐतिहासिक ठरला असता.

By स्वदेश घाणेकर | Published: August 13, 2018 11:25 AM

Open in App

इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा झालेला पराभव, यात नवीन काहीच नाही. भारताने येथे विजय मिळवला, तर भारताने मालिकेत पुनरागमन केले असते. इंग्लंडमधील आपली कामगिरी लक्षात घेता, लॉर्ड्सवरील पराभवाचा 'पराचा कावळा' करण्याची खरंच आवश्यकता नाही. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि काही अंशी वेस्ट इंडिज या जलद गोलंदाजीसाठी पोषक असलेल्या देशांमध्ये भारताच्या कामगिरीचा आलेख कायम उतरता राहिलेला आहे. त्यामुळे लॉर्ड्सवरील पराभव हा त्याच आलेखाचा एक भाग आहे. 

India vs England 2nd Test: अँडरसन - ब्रॉडचा भेदक मारा, लॉर्ड्स कसोटीत भारताचा दारुण पराभव)

या पराभवाने भारतीय संघाच्या कमकुवत बाजू पुन्हा समोर आणल्या आणि त्यावर नक्कीच चर्चा व्हायला हवी. सलामीचा गुंता, मधल्या फळीचे अपयश, अष्टपैलू खेळाडूची उणीव यावर भारतीय संघाला अद्याप तोडगा काढता आलेला नाही. सध्याच्या घडीला भारतीय संघाकडे सलामीसाठी मुरली विजय, शिखर धवन आणि लोकेश राहुल हे तीन पर्याय आहेत. जानेवारी ते ऑगस्ट 2018 या कालावधीत या खेळाडूंना समसमान संधी मिळाली. त्यात त्यांनी मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध झालेली एकमेव कसोटी वगळता उठावदार कामगिरी केलेली नाही. धवनने पाच डावांत केवळ 178 धावा केल्या आहेत आणि त्यात 107 (अफगाणिस्तान) धावा ही सर्वोत्तम खेळी आहे. राहुल आणि विजय यांनी अनुक्रमे 10 व 11 डावांत प्रत्येकी 119 व 233 धावा केल्या आहेत. अफगाणिस्तान कसोटीत राहुलने 54 आणि विजयने 105 धावा केल्या आहेत. आफ्रिका आणि इंग्लंड मालिकेत हे खेळाडू सपशेल अपयशी ठरले आहेत. 

( India vs England Test: म्हणून आम्ही हरलो, विराट कोहलीचा मोठा खुलासा )

मधल्या फळीत कर्णधार विराट कोहली वगळता चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना सातत्याने येणारे अपयश हा डोकेदुखीचा विषय आहे. त्यामुळे अनेकदा विराट प्रचंड दडपणाखाली खेळताना दिसला आहे. मधल्या फळीत राहुलचा पर्याय वापरून पाहिला, परंतु यशस्वी ठरला नाही. हार्दिक पांड्या हा अष्टपैलू म्हणून संघात कायम आहे, परंतु त्याचीही कामगिरी हवी तशी समाधानकारक झालेली नाही. इंग्लंड दौ-यात गोलंदाजांची कामगिरी समाधानकारक झालेली आहे, परंतु कोणत्या सामन्यात कोणता गोलंदाज खेळवायचा हा गुंता सोडवण्यात विराट अपयशी ठरला. लॉर्ड्सवर कुलदीप यादव आणि आर. अश्विन हे दोन  फिरकीपटू खेळवण्यात काहीच अर्थ नव्हता. तरीही विराटने हा निर्णय घेतला आणि तोंडघशी पडला. जलद मा-याला मदत करणा-या खेळपट्टीवर उमेश यादवला बसवून कुलदीपला खेळवण्याचा काय फायदा झाला, याचे उत्तर विराटच देऊ शकेल.

लॉर्ड्स कसोटीत भारताला तिस-यांदा डावाने पराभव पत्करावा लागला. मात्र 1974 नंतर प्रथमच लॉर्ड्सवर डावाने पराभूत होण्याची नामुष्की भारतावर ओढावली. या पराभवानंतर विराटने दिलेली प्रतिक्रिया फार महत्त्वाची ठरते.  संघ निवडण्यात चूक झाल्याची कबुली त्याने दिली. लॉर्ड्स पराभवानंतर विराटला झालेला साक्षात्कार भारताच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचा ठरणारा आहे. स्वतःची चूक मान्य करण्यासही मोठे धाडस लागते आणि ते विराटने दाखवले, म्हणून त्याचे कौतुक. पण त्याने ते केले नसते तर पुढचं पाठ मागचं सपाट, असे म्हणण्याची वेळ भारतावर आली असली.

9.83इंग्लंड मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत भारताच्या पहिल्या तीन क्रमांकाच्या खेळाडूंना संयुक्तरीत्या 9.83 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. दोन किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेतील भारतीय खेळाडूंची ही लाजिरवाणी कामगिरी आहे. यापूर्वी 2002-03च्या न्यूझीलंड दौ-यात ही सरासरी 13.91 अशी होती.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटक्रीडा