मुंबई - विराट कोहलीने ट्रेंट ब्रिज कसोटीत दर्जेदार खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. इंग्लंडविरूद्धच्या या मालिकेत भारताने आव्हान कायम राखले आहे. इंग्लंड २-१ अशा आघाडीवर असला तरी तिसऱ्या कसोटी विजयानंतर भारतीय खेळाडूंचे मनोबल चांगलेच उंचावलेले आहे. त्यामुळे ३० ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीत विजय मिळवून मालिका बरोबरीत आणण्याचा भारताचा निर्धार आहे. संघाच्या कामगिरी बरोबरच या कसोटीत पुन्हा एकदा विराट केंद्रस्थानी आहे.
ट्रेंट ब्रिज कसोटीत विराटने दोन्ही डावांत मिळून २०० धावा केल्या. या मालिकेत तीन सामन्यांत त्याच्या नावावर ४४० धावा आहेत आणि त्याच जोरावर त्याने ICC कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानही गाठले. या मालिकेतील दोन सामने खेळायचे आहेत आणि चौथा सामना ३० ऑगस्टपासून साउदॅम्प्टन येथे सुरू होणार आहे. या सामन्यात पहिल्या डावात ६ धावा करताच विराट ६००० कसोटी धावांचा पल्ला गाठेल. यासह तो महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडेल.
चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात विराटने सहा धावा केल्या तर ११९ डावांत त्याच्या नावावर ६००० धावा जमा होतील. सचिनने १२० डावांत सहा हजार धावा केल्या आहेत. याशिवाय विराटला आणखी एक महान फलंदाज राहुल द्रविड याचा विक्रम मोडण्याची संधी आहे. इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत सर्वाधिक ६०२ धावांचा विक्रम द्रविडच्या नावावर आहे. विराटने तीन सामन्यांत ४४० धावा केल्या आहेत आणि उर्वरित दोन कसोटिंत तो हाही विक्रम मोडू शकतो.