बर्मिंगहॅम - इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीला आजपासून बर्मिंगहॅम येथील एडबॅस्टन स्टेडियमवर सुरूवात होत आहे. चार वर्षांपूर्वी भारतीय संघाला इंग्लंड भूमीत 3-1 असा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आजपासून सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. विशेषतः भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या कामगिरीची सर्वांना उत्सुकता लागली आहेत.
2014च्या पाच सामन्यांच्या मालिकेत आणि दहा डावांत विराटला केवळ 134 धावा करता आल्या होत्या. उसळी आणि स्विंग घेणा-या इंग्लिश खेळपट्टींवर तो चाचपडत होता. पण, चार वर्षांत विराटने आपल्या कामगिरीच्या जोरावर सध्याच्या घडीतील सर्वोत्तम फलंदाजाचा मान पटकावला आहे. त्यामुळे आता तो इंग्लंडच्या खेळपट्टीवर कसा खेळतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
पहिल्या कसोटीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने स्वतःला सिद्ध करण्यासाठी नव्हे तर संघाला हातभार लावण्यासाठी खेळायचे आहे. तो म्हणाला,'कोणत्याही देशात स्वतःला सिद्ध करायचे आहे, या हेतूने मी कधीच खेळत नाही. संघ हे माझे प्राधान्य आहे. त्यामुळे संघासाठी मला धावा करायच्या आहेत. माझ्या आणि संघाबद्दल काय लिहिले जात आहे, हे मी वाचत नाही. त्यासाठी वेळ घालवण्याची इच्छाही नाही. '