मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका संपली. भारताने ती 1-4 अशा मोठ्या फरकाने गमावली. पण भारतासाठी सर्वात चांगली गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे विराट कोहलीची फलंदाजी. या मालिकेत आपल्या फलंदाजीच्या जोरावर त्याने काही प्रमाणात जान आणली. पाच कसोटी सामन्यांमध्ये त्याने 593 धावांचा डोंगर उभारला. भारताचा हा मर्द चांगला लढला असला तरी त्याच्या धावांच्या जोरावर भारताला जास्त विजय मिळवता आले नाहीत.
भारताकडून कोहली या मालिकेत एकाकी दमदार फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांच्याकडे चांगले फलंदाजीचे तंत्र आहे. त्यांनी ते घोटवलेही आहे. पण या मालिकेत मात्र त्यांना सातत्यपूर्ण धावा करता आल्या नाहीत. कोहलीकडे त्यांच्यासारखे तंत्र नाही. तो एक आक्रमक फलंदाज आहे. पण तरीदेखील इंग्लंडच्या स्विंग खेळपट्टीवर त्याने तग धरला. हे सारे त्याने जिद्दीच्या जोरावर करून दाखवले. आजच्या पिढीच्या भाषेत बोलायचं तर कोहलीने आपले गट्स दाखवले.
या मालिकेत कोहलीच्या जवळपास कोणताही फलंदाज फिरकू शकला नाही. कोहलीने 593 धावा केल्या तर त्यानंतर दुसरा क्रमांक लागलेल्या जोस बटलरच्या नावावर 349 धावा होत्या. जवळपास अडीचशे धावांचा फरक आहे. त्यामुळे कोहलीने जी फलंदाजी केली त्याला दाद द्यायलाच हवी. कारण जर एखादा फलंदाज जर एवढ्या दमदार धाव करत असेल आणि अन्य फलंदाज त्याच्या जवळपास जाऊ शकत नसतील तर कोहलीला दाद द्यायलाच हवी.
कोहलीच्या या दमदार फलंदाजीनंतर काही विश्लेषकांमध्ये एक चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा करताना त्यांनी कोहलीची भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरशी तुलना करायला सुरुवात झाली आहे. एकेकाळी असे म्हटले जायचे की सचिन खेळतो आणि भारत हरतो. तोच सूर आता काही जणांनी आळवायला सुरुवात केली आहे. कारण सचिनकडेही भारताचे कर्णधारपद देण्यात आले होते. तेव्हा सचिन दमदार फलंदाजी करायचा, धावांचा डोंगर उभारायचा पण एक कर्णधार म्हणून त्याला जास्त सामने किंवा मालिका जिंकता आल्या नाही. सचिनच्या कारकिर्दीत जिंकलेला सहारा चषक, फक्त हीच गोष्ट अधोरेखित होत राहते. त्यामुळे सचिन एक महान फलंदाज असला तरी तो कॅप्टन मटेरियल नव्हता, हे सचिनसहीत जवळपास सर्वांनी मान्य केले आहे. तिच वेळ आता कोहलीवरही आली आहे, असे काही जाणकारांचे म्हणणे आहे. त्यांनी या मालिकेत कोहलीच्या धावांच्या जोरावर ते सिद्ध करण्याचा प्रयत्नही केला आहे.
पहिल्या सामन्यात कोहलीने 149 आणि 51 धावा केल्या. परिणाम भारत पराभूत झाला. जर एखादा खेळाडू एका सामन्यात एका संघाच्या जवळपास जाणारी धावसंख्या करत असेल तर त्या खेळाडूने सामना जिंकवून द्यायलाच हवा. दुसऱ्या डावात भारताला तशी संधी होती. कोहली चांगल्या फॉर्मात होता. पण अर्धशतक झाल्यावर फक्त एक धाव करून तो पायचीत झाला. दुसरा सामना लॉर्ड्सवर, म्हणजेच क्रिकेटच्या पंढरीत झाला. कोहली या सामन्यात अपयशी ठरला. तिसऱ्या सामन्यात कोहलीने 97 आणि 103 अशा धावा केल्या. भारताने हा एकमेव सामना मालिकेत जिंकला. चौथ्या सामन्यात कोहलीने 46 आणि 58 धावा केल्या. भारत या सामन्यात पराभूत झाला. पाचव्या सामन्याच्या पहिल्या डावात कोहलीचे अर्धशतक एका धावेने हुकले, तर दुसऱ्या डावात त्याला भोपळाही फोडता आला नाही. दुसऱ्या डावात जर त्याने फक्त सात धावा केल्या असत्या तर कोहलीच्या मालिकेत सहाशे धावा पूर्ण झाल्या असत्या.
भारत आणि इंग्लंड यांच्यात जर सिंगल विकेटचा सामना असला असता तर कोहलीने बाजी मारली असती, यात वाद नाहीच. पण हा दोन संघांमधला सामना होता. कोहलीला अन्य खेळाडूंची साथ मिळाली नाही, हे सत्य आहे. पण संघातील खेळाडूंचे मनोबल सकारात्मक ठेवता आले नाही, याचा दोष कुणाचा. कोहलीने आतापर्यंत जवळपास प्रत्येक सामन्यात बदल केला. मालिकेतील चौथा सामना हा त्याला अपवाद होता. पण कोहलीला बहुतेक असा विक्रम करायचा होता. त्यामुळेच त्याने आर. अश्विन दुखापतग्रस्त असूनही त्याला खेळवले. या एका निर्णयाने अश्विनची कारकिर्द धोक्यात येऊ शकते, याचा विचार का केला नाही? या प्रश्नाचे उत्तर कर्णधाराने द्यायला हवे.
आतापर्यंत भारताचे जे कर्णधार यशस्वी ठरले त्यांनी खेळाडू घडवले. नजीकच्या काळातली आपण उदाहरणं पाहूया. सौरव गांगुली. भारताला जिंकायला लावणारा कर्णधार. गांगुली आक्रमक होता. इंग्लंडमध्येच त्याने काढलेले टी-शर्ट आठवत असेलंच. पण गांगुलीने झहीर खान, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग असे काही खेळाडू घडवले. या खेळाडूंच्या जीवावर गांगुली 2003च्या विश्वचषकात अंतिम फेरीपर्यंत संघाला घेऊन गेला होता. त्यानंतर भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे उदाहरण आपण घेऊ. धोनीने आर. अश्विन, रवींद्र जडेजा, सुरेश रैना या खेळाडूंना घडवले. प्रत्येक कर्णधाराला आपले घडवलेले खेळाडू संघात हवे असतात, त्यासाठी राजकारणही होतं. पण ते सर्वस्व चुकीचं आहे, असं आपण म्हणू शकत नाही. आता कोहलीने कोणते खेळाडू घडवले, याचं उत्तर मिळत नाही. कोहली हा स्वत:च्या फलंदाजीवर जेवढा मेहनत घेतो तेवढाच खेळाडूंना घडवण्यात घेत नाही आणि याचाच परिपाक भारताचा पराभव आहे, हे मान्य करायला हवं.
मालिका 1-4 अशी पराभूत झाल्यावरही एक कर्णधार म्हणून जर कोहली हा सर्वोत्तम संघ आहे, असं म्हणतं तर ते अपरीपक्वतेचे लक्षण आहे. फक्त मोठ्या बाता मारून कोणताच संघ जिंकत नसतो, हे त्याला आणि संघात वाफेचे इंजिन असलेल्या शस्त्री गुरुजींना कुणीतरी समजून सांगायला हवे. कोहली चांगला खेळला, लढला, धावांचा डोंगर त्याने रचला, पण भारताचा मालिकेत दारूण पराभव झाला हे सत्य मान्य करायला हवं.