नवी दिल्ली : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दोन कसोटी सामने झाले आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये भारताच्या पदरी पराभव पडला आहे. या दौऱ्यापूर्वी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बरेच ' बोलबच्चन ' दिले होते. पण आता पराभवानंतर शास्त्री शांत का आहेत, असा सवाल भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने विचरला आहे.
प्रतिस्पर्धी, देश, खेळपट्टी, वातावरण कसेही असो, आम्ही कुणालाही घाबरत नाही. क्रिकेट विश्वातील कोणत्याही देशात आम्ही विजयाचा झेंडा फटकावण्यासाठी सज्ज आहोत, असे शास्त्री यांनी इंग्लंड दौऱ्यापूर्वी सांगितले होते. पण दोन कसोटी सामन्यांतील पराभवानंतर मात्र शास्त्री यांनी कोणतेच वक्तव्य केलेले नाही.
याबाबत हरभजन म्हणाला की, " शास्त्री यांनी तिसऱ्या कसोटी सामन्यांपूर्वी पराभवाची कारणमीमांसा करायला हवी. इंग्लंड दौऱ्यापूर्वी शास्त्री यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. त्यापैकी कोणत्याही गोष्टी कसोटी मालिकेत दिसत नाही. पण जर भारताला कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला तर शास्त्री यांचे विधान खरे ठरणार नाही. त्यांना काही गोष्टी मान्य करायलाच लागतील. "