लंडन : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये दोन कसोटी सामने झाले आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे. या दोन्ही सामन्यांत भारताच्या फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पण भारताच्या संभाव्य संघात एक फलंदाज असा आहे की ज्याने इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावले आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावणाऱ्या ' या ' फलंदाजाला विराट कोहली संधी देणार का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या लढतीत सर्वच फलंदाज अपयशी ठरले होते. सलामीवीर मुरली विजयला तर दोन्ही डावांत भोपळाही फोडता आला नव्हता. दिनेश कार्तिकला दोन्ही सामन्यांत फक्त 21 धावा करता आल्या आहेत. उपकर्णधार अजिंक्य रहाणेही अयशस्वी ठरला आहे. हे पाहता तिसऱ्या सामन्यासाठी संघात बदल करताना ' या ' त्रिशतकवीराला संधी मिळणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.
भारताचे मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरत आहे. पण भारताच्या संभाव्य संघात करुण नायरसारखा युवा फलंदाज आहे. करुणने इंग्लंडविरुद्ध नोव्हेंबर 2016 साली खेळताना 303 धावांची विक्रमी खेळी साकारली होती. त्यामुळे त्याला आता भारतीय संघ तिसऱ्या सामन्यासाठी संघात स्थान देणार का, हा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे.