India vs England 5th Test ( Marathi News ) : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) कोणत्या वैयक्तिक कारणामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. विराट व अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. मंगळवारी त्यांनी सोशल मीडियावरून ही गोड बातमी सर्वांना सांगितली. विराट व अनुष्का यांनी त्यांच्या मुलाचे नाव अकाय असे ठेवल्याचेही जाहीर केले. विराटचा लंडनमधील फोटोही समोर आला आहे. आता या गोड बातमीनंतर विराट कोहली लंडनहून थेट धर्मशाला इथे येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भारत-इंग्लंड यांच्यातली पाचवी आणि शेवटची कसोटी ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवली जाणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीसाठी जाहीर झालेल्या भारतीय संघात विराटचे नाव होते. पण, त्याने कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि BCCI यांची परवानगी घेऊन या दोन कसोटीतून माघार घेतली. त्यावेळी बीसीसीआयने जाहीर केलेल्या निवेदनात विराटने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्याचे सांगण्यात आले होते आणि त्याच्या खाजगी आयुष्याची गोपनियता राखली जावी, असे आवाहनही केले होते. विराट दुसऱ्यांदा बाबा बनणार ही चर्चा तेव्हापासूनच जोर धरली गेली होती. पण, एका ट्विटने त्याची आई आजारी असल्याची अफवा पसरली. त्यामुळे चाहते संभ्रमात होते.
विशाखापट्टणम कसोटीनंतर विराट राजकोट येथे खेळेल अशी आशा होती आणि विराटच्या रिप्लायची वाट पाहत बीसीसीआयने संघ उशीरा जाहीर केला. पण, त्यातही विराटचे नाव दिसले नाही आणि तो चौथी कसोटीही खेळणार नाही, हे बीसीसीआयच्या कालच्या ट्विटने स्पष्ट झाले. पण, आता तरी तो पाचव्या कसोटीत खेळेल का असा प्रश्न पडतोय. BCCI ने चौथ्या कसोटीचा संघ काल जाहीर केला. याचा अर्थ पाचव्या कसोटीत विराटच्या पुनरागमनाची आशा अजूनही कायम आहे. तुर्तास तरी विराट-अनुष्का आणि त्याचं नवीन बाळ लंडनमध्ये आहेत.
चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, केएस भरत, देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप