चेन्नई : ऑस्ट्रेलियामध्ये भारताला शानदार विजय मिळवून देणारा अजिंक्य रहाणेकडून विराट कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी घेणे रंजक कथेप्रमाणे आहे. त्यावर भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या आगामी कसोटी मालिकेदरम्यान बरीच चर्चा होईल, असे मत इंग्लंडचा माजी दिग्गज खेळाडू केव्हिन पीटरसनने व्यक्त केले.
चार सामन्यांच्या मालिकेला शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे. स्टार स्पोर्ट्सचा कार्यक्रम ‘क्रिकेट कनेक्टेड’मध्ये पीटरसनने या महत्त्वाच्या मालिकेला प्रारंभ होण्यापूर्वी विश्लेषण केले. तो म्हणाला,‘कोहली, रहाणे, अँडरसन कशी कामगिरी करतात, याबाबत उत्सुकता आहे. ऑस्ट्रेलियामध्ये रहाणेने संघाचे नेतृत्व केल्यानंतर कोहली पुन्हा संघात परतला. तो कसे जुळवून घेईल? यावर बरीच चर्चा रंगणार आहे.’
तो म्हणाला, ‘इंग्लंड संघात जोफ्रा आर्चर आहे. तो पुजाराला बाद करू शकेल? बुमराहसुद्धा पुनरागमन करीत आहे.’ ‘या कसोटी मालिकेत बऱ्याच वेगवेगळ्या शक्यता आहेत, पण माझ्या मते या मालिकेदरम्यान एकमात्र चर्चेचा केंद्रबिंदू राहील तो म्हणजे रहाणेने ऑस्ट्रेलियात शानदार नेतृत्व केल्यानंतर कोहलीच्या या भूमिकेतील पुनरागमनाच्या मुद्यावर बरीच चर्चा होईल’, असेही पीटरसन म्हणाला
.
इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज डोमिनिक कॉर्कच्या मते, भारतीय संघ ही मालिका जिंकेल. तो म्हणाला, ‘भारत ही मालिका जिंकेल; पण इंग्लंड संघही चांगल्या स्थितीत आहे. इंग्लंडने अलीकडेच श्रीलंकेचा पराभव केला होता आणि स्टोक्स, आर्चर व बर्न्ससारख्या खेळाडूंचे पुनरागमन लाभदायक ठरेल. त्यानंतर माझ्या मते भारत बलाढ्य संघ असून मालिका जिंकेल. शुभमन गिल व ऋषभ पंत यांच्यासारखे भारतीय युवा खेळाडू या मालिकेत शानदार कामगिरी करतील, अशी आशा आहे.’
या मालिकेत भारतच दावेदार
भारत ही मालिका जिंकण्याचा १०० टक्के दावेदार आहे, यात कुठली शंका नाही. त्यात इंग्लंडच्या रोटेशन नीतीची भूमिका राहील. त्यात मुख्य खेळाडूंना विश्रांती दिली जाईल. भारताला मायदेशात खेळण्याचा लाभ मिळेल. कोहली परत आलेला आहे. इंग्लंडने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आपला सर्वोत्तम संघ निवडलेला नाही. माझ्य मते, जॉनी बेयरस्टो येथे असायला हवा होता; पण तो येथे असेल असे मला वाटत नाही.
Web Title: India VS England: '... that's what will be discussed'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.