मुंबई : सध्याच्या घडीला क्रिकेट वर्तुळामध्ये चर्चा आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेची. आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे, तर इंग्लंड पाचव्या स्थानी आहे, पण तरीदेखील भारतासाठी हा दौरा खडतर ठरेल, असे बऱ्याच जणांना वाटत आहे. पण ' या ' पाच गोष्टी त्यांना इंग्लंडमध्ये विजय मिळवता येऊ शकेल.
दमदार सलामी : या दौऱ्यात भारताला दमदार सलामी मिळाली तर भारताच्या विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो. गेल्या दौऱ्यात भारताने मुरली विजय, शिखर धवन आणि गौतम गंभीर या तीन सलामीवीरांना संधी दिली होती. पण त्यावेळी मुरली विजयचा अपवाद वगळता अन्य दोन सलामीवीर नापास ठरले होते.
विराट कोहलीची फलंदाजी : संघाचा कर्णधार जर चांगली कामगिरी करत असेल तर त्याचा एक चांगला संदेश संघापर्यंत पोहोचतो. त्यामुळे यावेळी विराट कोहलीची फलंदाजी चांगली झाली तर त्याचा सकारात्मक परीणाम संघावर होऊ शकतो. गेल्या दौऱ्यात कोहलीला 10 डावांमध्ये फक्त 134 धावाच करता आल्या होत्या. पण यावेळी त्याने चांगल्या धावा केल्या तर भारत विजय मिळवू शकतो.
रहाणे आणि पुजारा यांचे तंत्र : भारतीय संघात सध्याच्या घडीला अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे चांगले तंत्रशुद्ध फलंदाज आहेत. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या आणि वातावरण पाहता तंत्रशुद्ध फलंदाजांची कामगिरी महत्त्वाची ठरते. त्यामुळे हे दोघे या दौऱ्यात कशी कामगिरी करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
तळाचे फलंदाज : इंग्लंडच्या दौऱ्यात बऱ्याचदा तळाचे फलंदाजही महत्त्वाचे ठरतात. कारण सकाळच्या सत्रात कमी धावांत काही बळी गमावले असतील तर त्यानंतर तळाच्या फलंदाजांची कामगिरी महत्त्वाची ठरते. बऱ्याचदा तळाच्या फलंदाजांनी सामना जिंकवून देण्याच्या किंवा अनिर्णित राखण्याच्या गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे आर. अश्विन, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या यांची फलंदाजी महत्त्वाची ठरेल.
भेदक गोलंदाजी : भारताच्या ताफ्यात सध्याच्या घडीला मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, शार्दुल ठाकूर हे चांगले वेगवान गोलंदाज आहे. हे वेगवान गोलंदाज आपल्या अचूक माऱ्याच्या जोरावर संघाला विजय मिळवून देऊ शकतात. सध्या इंग्लंडमध्ये उन्हाळा आहे, त्यामुळे आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांची फिरकीही भारताच्या विजयात महत्त्वाचे योगदान देऊ शकते.