अहमदाबाद : भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याचे बुधवारपासून अमहमदाबाद येथे इंग्लंडविरुद्ध सुरू होत असलेल्या तिसऱ्या (दिवस-रात्र) कसोटीत खेळणे निश्चित मानले जात आहे. जखमी उमेश चेन्नईत झालेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता. बीसीसीआयने काही दिवसांआधी मोटेरावर खेळल्जा जाणाऱ्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. संघात उमेश यादवला स्थान देताना मात्र तो फिट असेल तरच खेळू शकेल, असे सांगण्यात आले होते.
तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन वेगवान माऱ्यावर अधिक भर देणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे चायनामॅन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याच्या पदरी पुन्हा निराशा येऊ शकेल. रवीचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल हे दोन फिरकी गोलंदाज खेळतील हे ठरले आहे. कुलदीपला अंतिम एकादशमध्ये स्थान मिळेल याची खात्री नाही. कुलदीपला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकही सामना न खेळताच परतावे लागले होते. चेन्नईतील दुसऱ्या कसोटीत मात्र संधी मिळाल्यानंतर त्याने अनेक वर्षांनंतर दोन गडी बाद केले.
कुलदीपचे स्थान धोक्यात
ऑस्ट्रेलियात शानदार कामगिरी करणारा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला बाहेर बसावे लागेल. चेन्नईच्या दुसऱ्या कसोटीत विश्रांती घेणारा जसप्रीत बुमराह हा अहमदाबाद येथे खेळेल. गुलाबी चेंडूवर बुमराह भेदक ठरू शकतो,असा अनेकांचा अंदाज आहे. त्याच्या पुनरागमनामुळे संघाची वेगवान गोलंदाजी आणखी भक्कम होईल.