लंडन - भारत आणि इंग्लंड यांच्या लॉर्ड्सवर खेळवण्यात आलेल्या दुस-या वन डे सामन्यात भारताला 86 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यादरम्यान महेंद्रसिंग धोनीला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. कर्णधार विराट कोहलीने प्रेक्षकांच्या या वागणुकीचा चांगलाच समाचार घेताना धोनीच्या बचावासाठी धाव घेतली. प्रेक्षकांची ही वागणूक दुर्दैवी असल्याचे मत विराटने व्यक्त केले.
दुस-या वन डे सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 322 धावांचा डोंगर उभा केला. त्याच्या दबावाखाली भारतीय संघाला केवळ 236 धावाच करता आल्या. भारताच्या इतर फलंदाजांप्रमाणे धोनीलाही मोठे फटके मारता येत नव्हते. नेहमी आक्रमक शैलीत खेळणा-या धोनीचा संथ खेळ पाहून प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यामुळे धोनीच्या प्रत्येक डॉट बॉलवर ( निर्धाव चेंडू ) प्रेक्षक विचित्र आवाज काढत होते. अशा परिस्थितीतही धोनी संयमाने खेळत राहिला आणि काही वेळानंतर मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. धोनीने 62.71 च्या स्ट्राईक रेटने ( सरासरी) 59 चेंडूंत 37 धावा केल्या. प्लंकेटच्या गोलंदाजीवर तो स्टोक्सच्या हातात झेल देऊन माघारी परतला.
चाहत्यांच्या या वागणुकीवर नाराजी व्यक्त करताना विराट धोनीच्या मदतीसाठी धावला. तो म्हणाला, असे अनेकदा घडले आहे. धोनीकडून चांगली कामगिरी झाली नाही, तर प्रेक्षक असे कृत्य करतात. हे दुर्दैवी आहे. आम्ही सर्व त्याला सर्वोत्तम फिनिशर म्हणून ओळखतो. क्रिकेटमध्ये सगळेच दिवस सारखे नसतात, आजचा दिवस त्याच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण संघासाठी वाईट होता. लोक लगेच निष्कर्ष काढून मोकळे होतात. धोनी आणि संघातील प्रत्येक खेळाडूवर मला पूर्ण विश्वास आहे.
Web Title: India vs England: Virat come for Dhoni's defense, gave a befitting reply
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.