लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यामधील कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या गेल्या दौऱ्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. पण या दौऱ्याच्या वेळी कोहलीने एक वक्तव्य केले आहे. त्यावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने कोहली हा खोटारडा असल्याचा बाऊन्सर टाकला आहे.
कोहलीने काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले होते. एका मुलाखतीदरम्यान कोहली म्हणाला होता की, " जर भारतीय संघ विजय मिळवत असेल तर माझ्याकडून धावा झाल्या नाहीत तरी चालेल. " कोहलीच्या या वक्तव्याचाच अँडरसनने समाचार घेतला आहे.
अँडरसन म्हणाला की, " माझ्यामते कोहली खोटं बोलतोय. कारण संघाच्या विजयात योगदान असणे, हे प्रत्येक खेळाडूला हवेसे असते. त्यामुळे या विधानाने कोहली खोटारडा आहे हे सिद्ध होत आहे. काही खेळाडू फक्त व्हिडीओ फुटेज बघून शिकत नाहीत, तर त्यांच्यासाठी गतअनुभवही महत्त्वाचा असतो. त्यामुळे कोहलीने गेल्या दौऱ्यातील अनुभवातून शिकायला हवे. "